Kartik Aaryan Dating Life : अभिनेता कार्तिक आर्यनने नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल मौन बाळगले आहे. सारा अली खानबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल असो किंवा अनन्या पांडेबरोबर त्याचं नाव जोडलं जाणं असो, या सर्व चर्चांवर त्याने कधीच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता ‘भूल भुलैया ३’फेम या अभिनेत्याने गेल्या दोन-तीन वर्षांतील त्याची डेटिंग लाईफ कशी होती यावर उघडपणे भाष्य केले आहे.
‘द मॅशेबल इंडिया’ या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने मागील दोन-तीन वर्षांतील त्याची डेटिंग लाईफ आणि शूट केलेल्या सिनेमांचा अनुभव यावर मत व्यक्त केले.
“कामामुळे वेळच मिळाला नाही”
मुलाखतीत कार्तिकला डेटिंग लाईफबद्दल विचारले असता कार्तिक म्हणाला, “मी सिंगल आहे, मला माझे लाईव्ह लोकेशन कोणालाच पाठवायचे नसते. मी कोणत्याही डेटिंग अॅपवरही नाही. ‘चंदू चॅम्पियन’साठी तयारी करणे आणि इतर सिनेमाचे शूटिंग यामुळे मला डेटिंगसाठी वेळच मिळाला नाही.”
कार्तिकने पुढे सांगितले की, “मी ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी एक वेळापत्रक ठरवून घेतलं होतं, ज्यात मला खेळाडूप्रमाणे जिम, आहार आणि झोपेचा नियमित पॅटर्न सांभाळावा लागत होता; हे सगळं दोन वर्षे सुरू होतं. शिवाय मी प्रथमच पोहणे शिकत होतो. या सगळ्यात व्यग्र असल्यामुळे मला डेटिंगसाठी अजिबात वेळ मिळाला नाही. शिवाय ‘भूल भुलैया ३’साठी ठराविक कालावधीत शूटिंग पूर्ण करणे हेही एक मोठं आव्हान होते, त्यामुळे मी संपूर्णपणे व्यग्र होतो,” असे त्याने सांगितले.
हेही वाचा…मराठी लेखकाने लिहिलीये Singham Again ची कथा! वीकेंडची कमाई पाहून म्हणाला, “रोहित शेट्टी सर…”
कार्तिक आर्यन सध्या त्याचा नवा चित्रपट ‘भूल भुलैया ३’च्या यशाचा आनंद घेत आहे. विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा ‘भूल भुलैया’ या हॉरर-कॉमेडी चित्रपट मालिकेतील तिसरा भाग आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
हेही वाचा…“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
कार्तिकच्या ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ची टक्कर
कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया ३’ आणि अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हे दोन चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच दिवशी प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांत प्रदर्शनाच्या आधीपासूनच म्हणजेच प्री बुकिंगपासूनच स्पर्धा होती. हे सिनेमे प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी दोन्ही सिनेमे पाहण्यासाठी गर्दी केली. दोन्ही सिनेमांनी १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘सॅकलिंक’च्या अहवालानुसार ‘सिंघम अगेन’ने भारतात १४६ कोटी, तर वर्ल्डवाईड १८६ कोटींची कमाई केली आहे; तर ‘भूल भुलैया ३’ने १२७ कोटींची कमाई केली असून वर्ल्डवाईड १६४ कोटींची कमाई केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd