Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’मध्ये बॉलीवूडकरांची मांदियाळी आहे. तर, दुसऱ्या बाजला ‘भुल भुलैया ३’मध्ये बॉलीवूडमध्ये आउटसायडर म्हणून ओळखला जाणारा कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या तगड्या अभिनेत्रींनी चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ नोव्हेंबरला दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर दुसऱ्या दिवसापासून बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कोणी बाजी मारलीये याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीचे काही दिवस बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’चं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं. पहिल्या वीकेंडला सुद्धा अजय देवगणचा चित्रपट आघाडीवर होता. मात्र, या सगळ्यात कार्तिकच्या ‘भुल भुलैया ३’ने सुद्धा तगडी टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

नवव्या दिवशी ‘भुल भुलैया ३’ने कमावले तब्बल…

एकीकडे पहिल्या आठवड्यात ‘सिंघम अगेन’चं कलेक्शन १७३ कोटी होतं. तर, ‘भुल भुलैया ३’चं पहिल्या आठवड्यातील कलेक्शन १५८.२५ कोटींच्या घरात होतं. त्यामुळे अजय देवगणचा चित्रपट सर्वात आधी २०० कोटींचा गल्ला जमावणार हे जवळपास स्पष्ट होतं पण, अचानक ‘भुल भुलैया ३’च्या कलेक्शनमध्ये सकारात्मक वाढ होऊ लागली.

शनिवारी ( ९ नोव्हेंबर ) नवव्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये अभूतपूर्व वाढ होऊन एकटा कार्तिक ( Bhool Bhulaiyaa 3 ) दमदार स्टारकास्ट असणाऱ्या ‘सिंघम अगेन’वर भारी पडला आहे. दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनमधलं अंतर सुद्धा आता कमी झाला आहे.

शनिवारी नवव्या दिवशी ‘भुल भुलैया ३’ने तब्बल १५.५० कोटी कमावले. तर, ‘सिंघम अगेन’ने १२.२५ कोटींचा गल्ला जमावल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ‘सिंघम अगेन’चं एकूण कलेक्शन १९६.७९ कोटी, तर ‘भुल भुलैया ३’चं कलेक्शन १८७.९९ कोटींपर्यंत पोहोचलं आहे. याशिवाय ‘भुल भुलैया ३’चं ( Bhool Bhulaiyaa 3 ) बजेट सुद्धा तुलनेने कमी आहे. त्यामुळे कार्तिक आर्यन संपूर्ण बॉलीवूडच्या फळीवर एकटा भारी पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

हेही वाचा : Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक

आता या दोन्ही सिनेमांच्या लढाईत सर्वात आधी २०० कोटींचा गल्ला कोण जमावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कार्तिक आर्यनच्या सिनेमाची घोडदौड पाहता ‘भुल भुलैया ३’ ( Bhool Bhulaiyaa 3 ) एकूण कलेक्शनच्या शर्यतीत बाजी मारेल असा अंदाज कार्तिकचे चाहते व चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhool bhulaiyaa 3 kartik aryan day 9 collection bigger than singham again know in details sva 00