‘भूल भुलैया ३’ सिनेमाचा टीझर आल्यापासून या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कार्तिक आर्यन याही सिनेमात रुह बाबाच्या भूमिकेत असून, अभिनेत्री विद्या बालनसुद्धा या सिनेमात आहे, असं टीझरवरून दिसलं होतं. आता सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यात आणखी एका मोठ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘भूल भुलैया ३’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सिनेमात माधुरी दीक्षितसह तृप्ती डिमरीही मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित एक भयावह अवतार साकारताना दिसत आहे. १९९० च्या दशकात आपल्या मोहक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी मोहिनी आता तिच्या पात्राने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे.

हेही वाचा…“पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून…”, आलिया भट्टच्या तोंडून कौतुकाचे ‘ते’ शब्द ऐकताच ‘या’ अभिनेत्रीचे डोळे पाणावले; व्हिडीओ व्हायरल

खरी मंजुलिका कोण?

‘भूल भुलैया ३’ या सिनेमात माधुरी दीक्षित मंजुलिकाच्या भूमिकेत आहे, तर विद्या बालनसुद्धा मंजुलिकाचीच भूमिका साकारत आहे; त्यामुळे खरी मंजुलिका कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. ट्रेलरमध्ये या दोघी एकत्र नाचताना आणि प्रेक्षकांना घाबरवताना दिसत आहेत. यात कार्तिक आर्यनला खरी मंजुलिका कोण, याचा शोध घेताना दाखवलं आहे. माधुरी, विद्या आणि कार्तिक यांच्यातली जुगलबंदी पाहताना, यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना हास्य आणि भीतीचा डबल डोस मिळणार असं दिसतंय.

हेही वाचा…नाकातून रक्त वाहत होतं तरी पाहिला सिनेमा…; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “माझा आवडता अभिनेता…”

‘भूल भुलैया ३’ च्या ट्रेलरमध्ये एक कुटुंब कार्तिकला त्यांच्या राजवाड्यात बोलावतं, जिथे घरात घडणाऱ्या भयावह गूढाचा उलगडा करण्यासाठी त्याची मदत मागितली जाते असा प्रसंग दाखवला आहे. संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांची विनोदी पात्रे या भयकथेत हलके-फुलके क्षण आणत आहेत.

‘भूल भुलैया ३’चा ट्रेलर लॉन्च जयपूर, राजस्थानमधील ऐतिहासिक राज मंदिर सिनेमागृहात मोठ्या थाटात पार पडला. या भव्य इव्हेंटला चित्रपटाचे प्रमुख कलाकार कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन उपस्थित होते. ट्रेलर लॉन्चच्या आधी दिग्दर्शक अनीस बज्मी म्हणाले, “भूल भुलैया ३ माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. या सिनेमात आम्ही हॉरर-कॉमेडीची सीमारेषा ओलांडून प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.”

हेही वाचा…‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा

‘भूल भुलैया ३’चे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि मुराद खेतानी असून, हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर, १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhool bhulaiyaa 3 trailer madhuri dixit as manjulika kartik aaryan vidya balan psg