२०२३ मध्ये ‘भीड’, ‘थॅंक यु फॉर कमिंग’, ‘द लेडी किलर’सारख्या हटके चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. भूमीचा आगामी ‘भक्षक’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे अन् यामुळेच भूमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भूमी सध्या व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान भूमीने तिच्या बालपणीची एक भयंकर आठवण सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वयाच्या १४ व्या वर्षी एका अनोळख्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने भूमीला स्पर्श केला होता अन् या गोष्टीचा तिच्या मनावर चांगलाच खोलवर परिणाम झाला. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान भूमीने त्या आठवणीबद्दल खुलासा केला आहे. भूमी म्हणाली, “मला अजूनही हे स्पष्टपणे आठवतंय. बांद्रा येथील परिसरात या गोष्टी तेव्हा वरचेवर घडायच्या. मी तेव्हा जवळपास १४ वर्षांची असेन, मी तेव्हा माझ्या कुटुंबाबरोबर होते अन् मला माझ्याबरोबर काय घडतंय याची जाणीव होती.”

आणखी वाचा : “कुणीच इतक्या खालच्या थराला…” पूनम पांडेविरोधात FIR दाखल करण्याची ‘सिने वर्कर्स असोसिएशन’ची मागणी

पुढे भूमी म्हणाली, “मी गर्दीत चालत होते अन् मागून कुणीतरी माझ्या पार्श्वभागावर चिमटे काढत होतं. मी मागे वळून पाहिलं पण हे कोण करतंय ते मला कळत नव्हतं, कारण तिथे खूप गर्दी होती. सतत कुणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करत होतं अन् मी त्यामुळे अस्वस्थ झाले होते. त्यावेळी माझ्या सोसायटीमधील इतरही बरीच मुलं होती, त्यामुळे मी त्या घटनेबद्दल कुणालाच सांगू शकले नाही. पण मला नेमकं कसं वाटत होतं हे मी अद्यापही विसरलेले नाही. त्याक्षणी आपण फार घाबरलेले असतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं हे आपल्याला कळत नाही, कारण आपल्याबरोबर जे काही घडतय ते पटवून घ्यायलाच वेळ लागतो.”

भूमी या अशा घटनांबद्दल बऱ्याचदा उघडपणे बोलली आहे. याबरोबरच भूमी तिच्या बऱ्याच चित्रपटातून समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर भाष्य केलं आहे. आता लवकरच भूमी ‘भक्षक’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात भूमी एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे जी कित्येक मुलींचा लैंगिक शोषण होण्यापासून बचाव करते. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ फेब्रुवारीपासून पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumi pednekar was groped in public at the age of 14 actress tells about horrible incident avn