प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच खूप चर्चेत आला. या चित्रपटाच्या टीमनेही चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढवण्यासाठी वेळच्यावेळी चित्रपटाबद्दल अपडेट्स दिले. या चित्रपटाची पोस्टर्स पाहून प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. बहुतांश प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत टिका केल्या. परंतु या सगळ्यात ओम राऊतचं काम पाहून भूषण कुमार खुश होत त्यांनी ओमला एक महागडी गाडी भेट केली आहे.
आणखी वाचा : “आजही मला रिक्षातून जाताना…”, ‘दिल्ली क्राईम’ फेम शेफाली शाहचे मोठे विधान
टी-सिरीजची निर्मिती असलेल्या ‘आदिपुरुष’ या बिग बजेट चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत याने केलं आहे. त्याच्या याच कामावर खुश होत टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांनी ओम राऊतला महागडी फेरारी एफ8 ट्रीबुटो ही गाडी भेट दिली आहे. भूषण कुमार यांनी ओमला भेट दिलेल्या या गाडीची भारतातली किंमत ४.०२ कोटी रुपये आहे. ओम राऊतने ‘आदिपुरुष’साठी केलेल्या कामावर भूषण कुमार खूप खुश आहेत. त्यामुळेच त्यांनी ही कार ओम राऊतला भेट दिली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही महागडी गाडी आधी भूषण वापरत होते. या गाडीची नोंदणी त्यांच्या नावावर होती. पण आता ती ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतच्या नावावर करण्यात आली आहे. यापूर्वी देखील ‘भूल भुलैय्या २’मधील कार्तिक आर्यनचे काम पाहून भूषण कुमार यांनी त्याला एक आलिशान गाडी भेट केली होती.
हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या लूकनंतर आता पोस्टरची चर्चा, अॅनिमेशन स्टुडिओकडून कॉपी केल्याचा दावा
‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर बेतलेली आहे. या चित्रपट चित्रपटात सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे आणि प्रभास श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सिता’ हे पात्र ती साकारणार आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेता सनी सिंग चित्रपटात ‘लक्ष्मणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ‘हनुमाना’ची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.