मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजुक होती. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
बॉलिवूडमधील कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमधून विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या रविवारच्या ब्लॉगमधून विक्रम गोखले व तब्बसूम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा>> “नट विस्मरणात जातो पण…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केला ‘नटसम्राट’मधील व्हिडीओ
“हे दिवस फारच उदासीन आहेत…मित्र व सहकलाकार…एकामागोमाग एक कलाकार आपल्याला सोडून जात आहेत…आपण ऐकतो, बघतो व त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तब्बसूम, विक्रम गोखले व काही प्रिय जवळच्या व्यक्ती…ते आपल्या आयुष्यात आले, त्यांची भूमिका निभावली आणि हा मंच सोडून निघून गेले”, असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा>> विक्रम गोखले यांना अमिताभ बच्चन यांच्यामुळे मिळालं मुंबईत घर, स्वत:च सांगितलेला किस्सा
निवेदिका व अभिनेत्री तब्बसूम यांनी १९ नोव्हेंबरला जगाचा निरोप घेतला. त्यापाठोपाठ विक्रम गोखले यांचंही २६ नोव्हेंबरला निधन झालं. त्यामुळे कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. अमिताभ बच्चन यांचे तब्बसूम व विक्रम गोखले यांच्यासह मैत्रीपूर्ण संबंध होते.