शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar)चे नाव ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. मात्र, काही काळ ही अभिनेत्री अभिनयापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच ती बिग बॉस १८ मध्ये सहभागी झाली होती. अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्रीला घराबाहेर पडावे लागले. आता शिल्पा शिरोडकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला ‘छैय्या छैय्या’ या गाण्यात काम करण्यासाठी विचारले होते, मात्र वाढलेल्या वजनामुळे तिला या गाण्यात काम करण्याची संधी मिळाली नाही, असा खुलासा तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिल्पा शिरोडकरने काय म्हटले?

शिल्पा शिरोडकरने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ‘छैय्या छैय्या’ या गाण्यात काम करण्याविषयी विचारले होते का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर होकार देत अभिनेत्रीने म्हटले, “मला त्या गाण्यात काम करता आले नाही, कारण मी जाड होते. त्यांनी मला मी लठ्ठ आहे, असे सांगितले. मला छैय्या छैय्या गाण्यात काम करण्याची संधी मिळाली नाही, याबद्दल नेहमी मला वाईट वाटते. मात्र, देवाने मला कायमच त्यापेक्षा अधिक दिले आहे आणि सध्याही तो देत आहे.”

छैय्या छैय्या गाण्याची कोरिओग्राफर फराह खान होती. तिने मला फक्त इतकेच म्हटले की, आपण पुन्हा कधीतरी एकत्र काम करू, सध्या आम्ही दुसरे कोणीतरी बघत आहोत. तू थोडीशी लठ्ठ आहेस, असेच काहीसे तिने सांगितले होते. मला त्याबद्दल जास्त काही आठवत नाही. मला माहीत आहे की मी लठ्ठ असल्यामुळे ती संधी गमावली.

यावर फराह खाननेदेखील वक्तव्य केले होते. करणवीर मेहराच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत फराह खानने म्हटले होते की, छैय्या छैय्या या गाण्यासाठी मी शिल्पाकडे गेले होते. पण, त्यावेळी शिल्पाला काहीतरी झाले होते. कारण त्यावेळी तिचे वजन किमान १०० किलो होते, त्यामुळे मी विचार केला की ती ट्रेनवर कशी चढेल? आणि ती जर ट्रेनवर चढू शकली तर शाहरुख कुठे उभा राहील?” असे म्हणत शिल्पाला छैय्या छैय्या या गाण्यात न घेण्याबद्दल फराह खानने वक्तव्य केले होते.

मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातील हे गाणे चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले. या गाण्यात मलायका अरोराने काम केले आहे. मात्र, त्याआधी शिल्पा शेट्टी व रवीना टंडन यांना हे गाणे ऑफर केले होते. त्यांनी विविध कारणांमुळे हे गाणे नाकारले होते.

दरम्यान, शिल्पा शिरोडकर ‘हम’, ‘आँखे’, ‘गोपी किशन’ अशा अनेक चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखली जाते. बिग बॉस १८ मधील तिच्या खेळामुळे ती मोठ्या चर्चेत होती. आता शिल्पा पुन्हा एकदा चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.