सुप्रसिद्ध गायक मिका सिंगने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेकविध विषयांवर गप्पा मारल्या. त्याबरोबरच चित्रपट निर्मिती क्षेत्रात आल्यानंतर त्याला आलेला अनुभव त्याने सांगितला. त्याने बिपाशा बासू(Bipasha Basu) व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव भयानक होता, असे म्हटले आहे. आता मिका सिंगच्या या वक्तव्यानंतर बिपाशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती मोठ्या चर्चेत आली आहे.
बिपाशा बासूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक कोट लिहिला, “नकारात्मक लोक गोंधळ निर्माण करतात, लोकांकडे बोट दाखवतात, दुसऱ्यांवर आरोप करतात आणि जबाबदारी घेण्यापासून पळ काढतात.” पुढे तिने लिहिले, “नकारात्मकतेपासून दूर राहा, देवाची तुमच्यावर कृपा असू दे. दुर्गा दुर्गा”, असे लिहीत नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला अभिनेत्रीने दिला आहे. नुकत्याच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मिका सिंगने बिपाशामुळे त्याचे नुकसान झाले. डेंजरस या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान बिपाशाने खूप नाटक केले होते. तिच्यामुळे मला निर्मिती क्षेत्रात आल्याचा पश्चात्ताप झाल्याचे म्हटले होते.
मिका सिंगने नेमके काय म्हटले होते?
“करण व बिपाशाने खूप नाटक केले. चित्रपटाच्या करारावर सह्या करताना त्यावर स्पष्टपणे स्क्रिप्टमध्ये ‘किसिंग सीन’ असल्याचे लिहिले होते. मात्र, पती-पत्नी असूनही त्यांनी स्क्रीनवर ‘किसिंन सीन’ करण्यासाठी नकार दिला. घसा खवखवत असल्यासारख्या सबबी त्यांनी सांगितल्या. त्यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले गेले होते. तरीही त्यांनी का नाटक केले, हे मला समजले नाही”, असे मिका सिंगने म्हटले होते
मिकाने पुढे म्हटले, “ज्या अभिनेत्रींना आता कामं मिळत नाहीयेत, त्या विचार करतात की, त्यांचं नशीब खराब आहे. मात्र, जे निर्माते तुमच्याकडे काम घेऊन येतात, त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. ते तुमच्यासाठी देव असतात. हे कलाकार धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्म यांसारख्या मोठ्या प्रॉडक्शन वा निर्मात्यांच्या पाया पडतात. अगदी छोट्या भूमिकेसाठीदेखील त्यांचे कौतुक करतात. पण छोट्या निर्मात्यांना आदर देत नाहीत, जे त्यांना बरोबर पैसे देतात.”

याबरोबरच, मिका सिंगने, मला एक कमी बजेटचा म्हणजेच चार कोटींमध्ये चित्रपट बनवायचा होता; पण त्याचे बजेट १४ कोटीपर्यंत गेले, असेही म्हटले.
दरम्यान, बिपाशा बासू मिका सिंग निर्मित डेंजरस या वेब सीरिजमध्ये याआधी शेवटची दिसली होती. त्यामध्ये तिने करण सिंग ग्रोव्हरबरोबर म्हणजे तिच्याच पतीबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यानंतर अभिनेत्री कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सोशल मीडियावर बिपाशा बासू सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती तिच्या मुलीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.