बृहन्मुंबई महानगर पालिकेने अर्थात बीएमसीने नुकतीच एक मोठी कारवाई करत मुंबईच्या मढ आयलंड परिसरातील एका बेकायदेशीर स्टुडिओवर बुलडोझर फिरवल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा स्टुडिओ काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या मालकीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या स्टुडिओमध्ये ‘रामसेतू’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. अस्लम शेख यांचा हा बेकायदेशीर स्टुडिओ समुद्रकिनारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या स्टुडिओचे काही भागही फेब्रुवारी २०२३ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. अस्लम शेख यांच्यावर हा बेकायदेशीर स्टुडिओ एक हजार कोटी रुपयांना बांधल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने या बेकायदेशीर स्टुडिओवर कठोर कारवाई करण्याचे आदेश बीएमसी आणि डीएमला दिले होते. अस्लम शेख यांच्या स्टुडिओपूर्वीच असे अनेक अवैध स्टुडिओ बीएमसीकडून पाडण्यात आले आहेत.
आणखी वाचा : अल्लू अर्जुनचं ‘पुष्पा २’मधील रौद्ररूप पाहिलंत? फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांना आठवला ‘कांतारा’
ठाकरे सरकारच्या काळात नियमांचे उल्लंघन करून हे बेकायदेशीर स्टुडिओ बांधले गेले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या स्टुडिओमध्ये अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ या चित्रपटाचं बराचसं चित्रीकरण झालं आहे. मढ बेटावरील या स्टुडिओमध्ये चित्रपटासाठी एक भक्कम सेट बांधण्यात आला होता. मुंबईशिवाय दमण आणि दीवमध्ये पाण्याखालील सीन शूट करण्यात आले होते.
आणखी वाचा : नंबी नारायणन यांच्यानंतर ‘या’ महान शास्त्रज्ञाच्या बायोपिकमध्ये झळकणार आर माधवन; पोस्टर प्रदर्शित
इतकंच नव्हे तर प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांचा आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे शूटिंगही याच स्टुडिओमध्ये झाले होते. चित्रपटाचे पहिले शेड्यूल मढ आयलंडमधील भाटिया बंगला आणि गोरेगाव येथील रिलायन्स स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आले. जवळपास ५५ ते ६० दिवसांचे चित्रीकरण मुंबईत झाले. यानंतर ‘आदिपुरुष’च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग हैदराबादमध्ये पार पडले. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.