अभिनेता बॉबी देओल(Bobby Deol) अनेकदा त्याच्या वडिलांबरोबरच्या बॉण्डिंगबद्दल व्यक्त होताना दिसतो. बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र त्याचे वडील आहेत. सनी देओल व बॉबी देओल या भावंडांनीदेखील वडिलांनंतर बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सनी देओलने ‘गदर २’मधून जोरदार कमबॅक केले. तर, अॅनिमल या चित्रपटातून बॉबी देओलने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. त्याच्या नकारात्मक भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेकदा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही खुलेपणाने बोलत असतो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
देओल कुटुंबाला आजही…
बॉबी देओलने नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की तुमच्या बाप लेकामध्ये म्हणजेच धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओलमध्ये सर्वांत उत्तम आयुष्य कोणी जगले आहे? यावर उत्तर देताना बॉबी देओल म्हणाला, “मला वाटतं की माझे वडील त्यांना हवं तसं आयुष्य जगले. जेव्हा ते या इंडस्ट्रीमध्ये आले. काम करू लागले. जसे सेलेब्रिटी लोक इतरांना भेटतात, तसे ते इतरांना भेटत नसत. ते त्यांच्या चाहत्यांना भेटताना एक माणूस म्हणून भेटत असत. ते त्यांच्याशी जोडले जातात. त्यांनी अनेकांसाठी खूप काही केले आहे. ते जे काही करीत ते मनापासून करीत. मला वाटतं की, देओल कुटुंबाला आजही लोकांकडून प्रेम मिळतं , त्याचं कारण ते आहेत. सगळं श्रेय त्यांचं आहे.”
“मी अशा लोकांना पाहिलं आहे, जे माझ्या वडिलांना जाणीव करून देत की, ते कोणीतरी स्पेशल आहेत. पण, माझे वडील त्यांना स्वत:बद्दल काय वाटते, या भावनेबरोबर प्रामाणिक राहिले. मी ही गोष्ट माझ्या वडिलांकडून शिकलो आहे. लोकांना त्यांच्याबद्दल काय वाटते यानुसार ते स्वत:बद्दलचं मत बनवत नाहीत. तर त्यांना स्वत:विषयी काय वाटते, याला ते महत्त्व देतात.”
सनी देओल आणि बॉबी देओलला मोठे होताना जे संस्कार मिळाले, त्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “यामध्ये फक्त माझ्या वडिलांचं योगदान नाही. माझी आई, माझी आजी आणि लग्नानंतर माझ्या पत्नी या सर्वांचं माझ्या आयुष्यात योगदान आहे. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात हे सगळेच माझ्याबरोबर होते. जशी माझी आई माझ्या वडिलांबरोबर कोणत्याही परिस्थितीत बरोबर राहिली. माझी सर्वांत मोठी शक्ती माझी पत्नी तान्या आहे. तिनं मला कायम हेच सांगितलं आहे की, मी विशेष आहे.”
बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेता नुकताच ‘डाकू महाराज’मध्ये दिसला होता. आगामी काळात तो ‘अल्फा’, ‘जन नायागन’ व ‘प्रियदर्शन’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याबरोबर १९५४ ला लग्नगाठ बांधली आणि १९८० मध्ये त्यांचे हेमामालिनी यांच्याबरोबर लग्न झाले.