अभिनेता बॉबी देओल(Bobby Deol)ने १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘धरम वीर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात बॉबी देओलचे वडील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे मुख्य भूमिकेत होते. बॉबी देओलने बालकलाकाराची भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले होते. आता बॉबी देओल व सनी देओल यांनी नुकताच ‘स्क्रीन’बरोबर संवाद साधला. यावेळी बॉबी देओलने या चित्रपटाची आठवण सांगितली आहे.
बॉबी देओल काय म्हणाला?
‘धरम वीर’ चित्रपटात बॉबी देओलने धर्मेंद्रच्या लहान वयातील भूमिका साकारली होती. याविषयी बोलताना बॉबी देओलने म्हटले, “मला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. मी पाच-सहा वर्षांचा असेन, त्यावेळी माझे वडील धरम वीर या चित्रपटात काम करत होते. त्यांना असा एक लहान मुलगा हवा होता, जो त्यांच्या सारखा दिसेल. पण त्यांना तसे कोणी मिळत नव्हते. शेवटी त्यांनी मला विचारले की तू माझ्या चित्रपटात अभिनय करणार का? माझ्या लहानपणीची भूमिका साकारणार का? मी त्यांना म्हटले की होय करेन. जेव्हा तुम्ही लहान असता, त्यावेळी तुम्हाला कशाची भीती वाटत नाही. आयुष्य सुंदर आहे, असे तुम्हाला वाटत असते. पुढे बॉबी देओलने या चित्रपटात ब्लॅक लेदरच्या घातलेल्या ड्रेसबद्दल बोलताना म्हटले की तो ड्रेस त्यांनी एका रात्रीत तयार करून घेतला होता. कारण- दुसऱ्या दिवशी मला शूटिंग करायचे होते.
बॉबी देओलने याबद्दल अधिक बोलताना म्हटले,”मी सीन शूट केला व माझ्या वडिलांना विचारले की माझे पैसे कुठे आहेत? मी काम केले आहे. मला माझे पैसे हवे आहेत.” चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक तिथेच होते, त्यामुळे माझ्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे माझ्या वडिलांना कळतच नव्हते. त्यांनी मला म्हटले, “तू शांत बस. मी तुला पैसे देतो. मी गाडीत बसलो. त्यांनी मला १० हजार रुपयांच्या नोटांचा बंडल दिला आणि मला सांगितले की हे पैसे तुझ्या आजीजवळ दे व ते स्टाफ मेंबर्समध्ये वाटले जातील, याकडे लक्ष दे.”
“मी खूप उत्सुकतेने घरी गेलो. मला माझा अभिमान वाटत होता. माझ्या आजीजवळ स्टाफ मेंबरमध्ये वाटण्यासाठी पैसे दिले. मी इतरा उत्सुक होतो की मी चित्रपटात काय केले हे माझ्या बहिणींना व काकूंना दाखविण्यासाठी मी घरातील सर्व हँगर्स तोडून टाकले. जेव्हा चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला, त्यावेळी माझ्यासाठी एक विशेष पुरस्कार ठेवला गेला, ज्यावर माझे नाव होते”, अशी आठवण बॉबी देओलने सांगितली आहे.
हेही वाचा: अल्लू अर्जुनने जखमी मुलाची भेट का घेतली नाही? त्यानेच सांगितलं कारण; म्हणाला, “मला आता..”
दरम्यान, बॉबी देओलने २०२३ मध्ये ‘अॅनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटात बॉबी देओले साकारलेल्या नकारात्मक भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. जमाल कुडू या गाण्यातील त्याची डान्स स्टेपदेखील चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले होते. त्या डान्स स्टेपची प्रेरणा कुठून मिळाली, याचा खुलासादेखील त्याने केला आहे. आता बॉबी देओलला नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.