बॉलीवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून जंजीर या सिनेमाला गणले जाते. अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारलेला हा सिनेमा चांगलाच गाजला होता. अमिताभ बच्चन यांची चित्रपटातील अँग्री यंग मॅन भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

जंजीर चित्रपटाची पटकथा सलीम खान व जावेद अख्तर यांनी लिहिली होती, तर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केली होती. मात्र, अमिताभ बच्चन हे या चित्रपटासाठी पहिली निवड नव्हते. धर्मेंद्र यांना या चित्रपटासाठी विचारले होते. मात्र, त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जंजीर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले होते. आता बॉबी देओलने त्याच्या वडिलांनी म्हणजेच दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी या ब्लॉकबस्टर चित्रपटाला का नकार दिला याचे भावनिक कारण सांगितले आहे.

धर्मेंद्र यांनी का नाकारलेला ‘जंजीर’ चित्रपट?

बॉबी देओलने नुकताच इन्स्टंट बॉलीवूडशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारण्यात आले की, त्याने किंवा त्याच्या कुटुंबातील इतर कोणी कोणाला मदत करण्यासाठी एखादा चित्रपट केला आहे का? यावर बोलताना बॉबी देओल म्हणाला, “माझ्या मावशीचे पती हे आर्थिक अडचणीत होते, त्यांच्यासाठी त्यांनी सत्यकाम हा चित्रपट केला होता. त्यावेळी वडिलांनी बहुतेक २५ लाख रुपये दिले होते. ६० च्या दशकात त्यांनी २५ लाख रुपये दिले होते. माझे वडील कायमच इतरांची काळजी घेतात.”

पुढे धर्मेंद्र यांनी जंजीर हा चित्रपट का नाकारला याचे कारण सांगत बॉबी देओल म्हणाला, “जेव्हा माझ्या वडिलांना जंजीर चित्रपटाची ऑफर मिळाली होती, तेव्हा त्यांना तो चित्रपट करायचा होता. आमची एक चुलत बहीण होती, कदाचित तिचे व प्रकाश मेहरा यांचे काहीतरी बिनसले होते. एके दिवशी ती घरी आली. ती वडिलांना म्हणाली, “तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही जर हा चित्रपट केला तर माझं मेलेलं तोंड बघाल; त्यामुळे वडिलांनी जंजीर चित्रपट नाकारला.”

धर्मेंद्र यांनीदेखील यावर वक्तव्य केले होते. २०२२ मध्ये एक्स अकाउंटवर लिहिले होते, “जावेद, कसा आहेस? दिखाव्याच्या या दुनियेत खऱ्या गोष्टी समोर येत नाहीत, मला लोकांना आनंदी ठेवायला येतं. गोष्टी मोठ्याने बोलण्याचे, सांगण्याचे कसबही शिकायला हवे होते.”

बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचे तर अॅनिमल या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. अभिनेत्याला या भूमिकेने एक वेगळी ओळख दिली. आश्रम या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. डाकू महाराजमध्येदेखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. आता तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.