‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन पहिल्याच भागापासून वादाच्या भोवऱ्यात अडकायला सुरुवात झाली आहे. पहिल्या भागात दीपिका पदूकोण व रणवीर सिंह यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा करताना दीपिकाने केलेलं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि त्यावरून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही करायला सुरू केलं. आता करण जोहर त्याच्या पुढील भागात कोणाला बोलवणार याची उत्सुकता लागली होती.
गेल्या काही दिवसांपासून सनी देओल ‘कॉफी विथ करण’च्या पुढच्या भागात दिसणार ही चर्चा होती. ही बातमी खरी ठरली आहे. नव्या भागात सनी देओल आणि बॉबी देओल या दोघा भावांनी हजेरी लावली आहे. नुकताच या नव्या भागाचा प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘गदर २’च्या कलेक्शनपासून वडील धर्मेंद्र यांच्या किसिंगपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींवर या दोघांनी गप्पा मारल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला धमक्या; आगामी चित्रपट ‘बस्तर’ ठरतोय निमित्त
याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बॉबीच्या सेकंड इंनिंगचंही करणने कौतुक केलं आहे. यादरम्यान बॉबीने त्याच्या करिअरमधील सर्वात खडतर दिवसांबद्दल भाष्य केलं आहे. चांगल्या भूमिका न मिळाल्याने बॉबीच्या फिल्मी करिअरला कालांतराने उतरती कळा लागली. यादरम्यान तो फार डिप्रेशनमध्ये होता, याबरोबरच त्याला दारूचंही व्यसन लागलं होतं. अशा काही गोष्टींबद्दल त्याने या चॅट शोमध्ये भाष्य केलं आहे.
बॉबी म्हणाला, “मी आशा सोडली होती. मला स्वतःचीच कीव यायची. याच काळात मी भरपुर दारू प्यायला लागलो. मी फक्त घरात बसून होतो आणि इतरांना दोष द्यायचो की कुणी माझ्याबरोबर काम का करू इच्छित नाही? मी चांगला नट आहे तर माझ्याबरोबर कुणीच काम का करत नाही? असे नकारात्मक विचार सतत माझ्या डोक्यात यायचे. माझ्या आजूबाजूला सकारात्मकतेचा लवलेशही नव्हता. मी फक्त घरी बसून असायचो आणि माझी पत्नी काम करायची.”
बॉबीची अशी अवस्था पाहून ही गोष्ट त्याच्या लहान मुलाच्या निदर्शनास अन् जेव्हा त्याच्या मुलांच्या तोंडून बॉबीने एक वाक्य ऐकलं तेव्हा मात्र त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. याविषयी सांगताना बॉबी म्हणाला, “एकेदिवशी मी माझ्या मुलाला बोलताना ऐकलं की त्याचे वडील फक्त घरात बसून असतात अन् आई बाहेर जाऊन काम करते, त्यावेळी मला मी कुठे चुकतोय याची जाणीव झाली आणि मी यातून बाहेर पडायचं ठरवलं. अर्थात मला त्यातून बाहेर यायला वेळ लागला.”
पुढे बॉबी म्हणाला, “त्यावेळी माझे आई, वडील, भाऊ, बहीण सगळे माझ्या आसपासच होते. पण तुम्ही कायम कोणाचातरी हात पकडून चालू शकत नाही, तुम्हाला कधी ना कधी स्वतःच्या पायावर उभं राहावंच लागतं. मी हळूहळू माझ्या कामावर लक्षकेंद्रित करू लागलो. मी त्यावेळी बाहेर पडून बऱ्याच लोकांना कामानिमित्त भेटलो.” नंतर बॉबी देओलने सलमान खानबरोबरच्या ‘रेस ३’मधून दमदार कमबॅक केला. त्यानंतर ‘क्लास ऑफ ८३’ सारखा चित्रपट आणि ‘आश्रम’सारख्या वेबसीरिजने बॉबीसाठी नवी दारं खुली केली. आता बॉबी रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये एका धासु अवतारात झळकणार आहे.