बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे मनोरंजनसृष्टीतील लाडका अभिनेता बॉबी देओल आहे. १९९५ मध्ये ‘बरसात’ चित्रपटातून अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, त्याला अनेक दुखापतीदेखील झाल्या होत्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने इटलीमध्ये वाघाबरोबर केलेल्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.
बॉबी देओल म्हणतो की, माझा भाऊ सनी देओल चित्रपटात माझी ज्या प्रकारे एंट्री होते, त्याने खूश नव्हता. त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन हे सर्व करायचे होते. त्यानंतर आम्ही वाघाबरोबरच्या झटापटीचा सीन शूट करण्यासाठी इटलीला पोहोचलो.
देओल बंधूंना सुरुवातीला हा सीक्वेन्स भारतात शूट करायचा होता; परंतु प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारामुळे घातल्या गेलेल्या प्रतिबंधात्मक नियमामुळे त्यांना परदेशात जावे लागले. बॉबी देओल म्हणतो की, त्या काळी भारतात प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल फारसा कोणी विचार करत नसे. जेव्हा सेटवर वाघाला आणले गेले तेव्हा त्यांनी त्याचे तोंड शिवले होते. ते पाहून आम्हाला वाईट वाटले. आम्ही त्यांना सांगितले की, ते प्राण्यावर अत्याचार करीत आहेत आणि आम्ही हे करू शकत नाही. ते दृश्य खूप क्रूर होते. या प्रसंगानंतर मला सनी देओलने इटलीतील एका माणसाबद्दल सांगितले; ज्याचे स्वतःचे प्राणिसंग्रहालय आहे आणि तेथील प्राणी प्रशिक्षित आहेत. म्हणून मी तिथे वाघाबरोबर सीन शूट केला. मी त्या सीनच्या शूटदरम्यान विचार करणे थांबवले. कारण- कुत्रा चावला, तर तुमची इतकी वाईट अवस्था होते; मग वाघाने चावा घेतला, तर काय होईल याची कल्पना न करणेच योग्य आहे. पण, तरीही त्या सीनचे शूटिंग करण्यात मजा आल्याचे बॉबी देओलने म्हटले आहे.
तो पुढे म्हणतो की, ‘बरसात’ चित्रपटाच्या वेळीच मी घोडेस्वारीचा एक सीक्वेन्स केला; जो आम्ही लंडनमध्ये शूट केला. त्यादरम्यानच मला अपघात होऊन माझा पाय मोडला होता. माझ्या पायात अजूनही रॉड आहे. बॉबी म्हणतो की, त्यानंतर लगेचच त्याला त्याच्या पुढच्या ‘गुप्त’ चित्रपटाचे शूटिंग करायचे होते. मोडलेल्या पायाने ‘गुप्त’ चित्रपटातील काही गाण्यांचे शूटिंग केल्याची आठवण त्याने सांगितली आहे. दरम्यान, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd