बॉबी देओल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. नुकत्याच आलेल्या ब्लॉकबस्टर ‘अॅनिमल’ चित्रपटात अबरार नावाची भूमिका त्याने साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉबीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. इतकंच नाही तर यानंतर बॉबीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासही लोक खूप उत्सुक आहेत. आज आपण बॉबी व त्याची पत्नी तान्या यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. तसेच दोघांची नेट वर्थही जाणून घेऊयात.
तान्या देओल बॉबीबरोबर अनेक इव्हेंट्सला हजेरी लावत असते. ती खूप सुंदर दिसते, पण प्रसिद्धीपासून दूर राहते. बॉबी देओल आणि तान्या देओल यांचे १९९६ मध्ये लग्न झाले होते. या जोडप्याला आर्यमन देओल आणि धरम देओल नावाची दोन मुलं आहेत. तान्या व बॉबीची प्रेमकहाणी १९९५ साली सुरू झाली होती. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, तान्याने बॉबीबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं.
“मी एका दिवाळीत चंकी पांडेंच्या घरी पत्ते खेळायला गेले होते. तिथे बॉबी आला आणि तो माझ्याबरोबर खेळायला बसला. आम्ही एकाच टेबलावर पत्ते खेळत होतो, तो माझ्याबरोबर खेळताना सारखा हारत होता, पण तो मला पैसे देत नव्हता. ‘तुला बाहेर जेवायला घेऊन जाईन’, असं तो म्हणत होता. हा असं का वागतोय? असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता,” असं ती म्हणाली होती.
तान्या पुढे म्हणाली, “नंतर थोड्या वेळाने त्याने मला फोन केला. रात्रीची वेळ होती आणि मला खूप झोप लागली होती. म्हणून मी फोन उचलला आणि मी त्याला म्हटलं, ‘मी तुला उद्या कॉल करेन.’ तो म्हणाला, ‘मी कोण आहे हे तुला माहीत नाही?'” त्यानंतर या दोघांचं बोलणं सुरू झालं, नंतर ते प्रेमात पडले आणि त्याच्या पुढच्या वर्षी १९९६ साली त्यांनी लग्नगाठ बांधली.
तान्या देओल ही दिवंगत कोट्याधीश देव आहुजा यांची मुलगी आहे. ते सेंच्युरियन बँकेचे प्रमोटर आणि 20th सेंच्युरी फायनान्स कंपनीचे एमडी होते. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. ते मुलीसाठी ३०० कोटी रुपयांची संपत्ती व शेअर्स सोडून गेले होते. तान्याला विक्रम आहुजा नावाचा भाऊ आणि मुनिषा नावाची बहीण आहे. तान्या इंटिरियर डिझायनर असून तिचे स्वतःचे फर्निशिंग स्टोअर आहे.
रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओलची अंदाजे एकूण संपत्ती ६६ कोटी रुपयांची आहे. ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, ‘अॅनिमल’मधील अबरार हकच्या भूमिकेसाठी बॉबी देओलने ४ ते ५ कोटी रुपये घेतले होते. तान्या व बॉबी त्यांच्या आर्यमान व धरम या दोन मुलांसह मुंबईतील विलेपार्ले इथे ६ कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहतात.