‘सौगंध’ चित्रपटात अक्षय कुमारबरोबर मुख्य भूमिकेत झळकलेली बॉलीवूड अभिनेत्री शांती प्रिया तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. शांती प्रियाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने टक्कल केल्याचं दिसून येत आहे.
शांती प्रियाने शेअर केलेल्या ताज्या फोटोंमध्ये तिने टक्कल केल्याचं दिसतंय. तसेच तिने तपकिरी रंगाचं ब्लेझर घातलं आहे. ते तिच्या दिवंगत पतीचं आहे. शांती प्रियाचा पती सिद्धार्थ रायचं २००४ मध्ये निधन झालं. २१ वर्षांनी शांती प्रियाने पतीच्या ब्लेझरमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत आहे. तिने स्मोकी आय मेकअप केला आहे, तसेच मॅट मेकअप व सोनेरी कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
टक्कल असलेले फोटो शेअर करत शांती प्रियाने लिहिलं, “मी नुकतंच टक्कल केलं आणि माझा अनुभव काहीसा वेगळा आहे. महिला म्हणून आपण बरेचदा आयुष्यात स्वतःला मर्यादा घालतो, नियमांचे पालन करतो आणि स्वतःला पिंजऱ्यात कैद करून ठेवतो. पण या बदलातून मी स्वत: ला मुक्त केलं आहे, सगळ्या मर्यादांमधून मी मुक्त झाले आहे. जगाने आपल्यावर लादलेले ब्यूटी स्टँडर्ड तोडण्याचा माझा हेतू आहे. मी खूप हिमतीने आणि माझ्या अंतःकरणातील विश्वासाने हे केलं आहे.”
“आज मी माझ्या दिवंगत पतीची आठवण त्यांच्या ब्लेझरच्या माध्यमातून जवळ ठेवली आहे,” असंही कॅप्शनमध्ये शांती प्रियाने लिहिलं आहे.
पाहा पोस्ट –
शांती प्रियाचा हा लूक पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या या लूकचं, तिच्या टक्कल करण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी ‘लांब केसात दाक्षिणात्य महिलांचं सौंदर्य आहे, तू हे का केलंस?’ असे प्रश्न विचारले आहेत.
शांती प्रियाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना टक्कल करण्याच्या निर्णयाबद्दल साशंक होते असं सांगितलं. कारण फिल्म इंडस्ट्रीत महिलांनी एका विशिष्ट प्रकारेच दिसायला हवं अशी धारणा झाली आहे. अभिनेत्रींचे ग्लॅमरस, सुंदर लांब केस असतात. त्यामुळे टक्कल करताना मनात भीती असल्याचं ती म्हणाली. “मी स्वतःलाच विचारलं की या भीतीमुळे मी माझ्या आवडत्या गोष्टी करू नये का?” असं शांती प्रियाने सांगितलं.
५५ वर्षांची शांती प्रिया शेवटची ‘बॅड गर्ल’ या तमिळ चित्रपटात झळकली होती.