पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळाने तामिळनाडूत धुमाकूळ घातला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नईत जोरदार पाऊस पडत असून सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. चेन्नईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सोशल मीडियावर पूरग्रस्त रस्त्यांचे व्हिडीओ क्लिप व्हायरल झाले आहेत. या चक्रीवादळामुळे सर्वसामान्यांसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान या वादळातून सुखरुप बाहेर पडल्याचं समोर आलं आहे.
अभिनेता विष्णु विशालने काही तासांपूर्वी एक्सवर (ट्वीट) पोस्ट केली आहे. यामधील फोटोंमध्ये बचाव पथकाबरोबर विष्णु विशाल आणि आमिर खान पाहायला मिळत आहे. ही पोस्ट करत विष्णुने अग्निशमन आणि बचाव पथकाचे आभार व्यक्त केले आहेत. माहितीनुसार, आमिर खान गेल्या काही महिन्यांपासून चेन्नईत आहे. त्याची आई झीनत हुसैन यांच्यावर चेन्नईत उपचार सुरू आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यावेळी त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर आहे इच्छाधारी नागिन, अभिनेत्री जुई गडकरी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हणाली…
याआधी अभिनेता विष्णु विशालने घराच्या आजूबाजूला झालेल्या परिस्थितीचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये विष्णुच्या घराबाहेर फक्त पाणी साचलेलं दिसत आहे. झाडं उन्मळून पडलेली पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं होतं की, माझ्या घरात पाणी शिरलं असून त्याची पातळी वेगाने वाढत आहे. मी मदतीसाठी विनंती केली आहे. वीज नाही, वाय-फाय नाही, फोनला सिग्नल नाही, काहीच नाही. गच्चीवरील एक विशिष्ट ठिकाण आहे, तिथे उभं राहिल्यावर मोबाइलला थोडा सिग्नल येत आहे. मला आणि इथे राहणाऱ्या इतरांना मदत मिळेल, अशी आशा आहे. मी चेन्नईच्या लोकांच्या वेदना समजू शकतो.
हेही वाचा – Video: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’, क्रांती रेडकरच्या मुलींनी रात्री १ वाजता गायलं गाणं, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, चेन्नईमधील या परिस्थितीचा सामना करण्यासाठी दक्षिणेतील अनेक कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कलाकारांनी १० लाख रुपयांची मदत केल्याचं वृत्त समोर आलं आहे.