अभिनेता आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. बॉक्स ऑफिसवर त्याचे चित्रपट तुफान कमाई करताना दिसतात. गेली अनेक वर्षे तो त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीवर राज्य करीत आहे. त्याचे चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत वरच्या स्थानी आहेत. मात्र, अनेक प्रसंगी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आमिर अडचणीत सापडला आहे.
हेही वाचा- “हे कठोर शासन नाही तर…” अतीक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करने व्यक्त केला संताप!
काही वर्षांपूर्वी असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पत्नी किरण रावने मुलांच्या चिंतेमुळे देश सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. आमिर खानने २०१५ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर आमिर खानवर टीका करण्यात आली होती. यानंतर आमिर खानने रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ शोमध्ये आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले होते. आपले विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे आमिर म्हणाला.
आमिर म्हणाला, “मी याच देशात जगेन आणि इथेच मरेन. त्या दरम्यान मुलांचे भविष्य डोळ्यांसमोर ठेवून माझी पत्नी भावुकपणे बोलली. इंडस्ट्रीत असा मी एकमेव अभिनेता आहे. ज्याचे भारताबाहेर एकही घर नाही. माझ्याकडे जे काही आहे, दोन-चार घरे आहेत ती फक्त भारतातच आहेत, मग मी भारत का सोडू? माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि अतिशयोक्ती करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण आमिरने दिले आहे.
गेल्या वर्षी, आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सोशल मीडियावर बॉलीवूडच्या बॉयकॉट ट्रेण्डनंतर आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला. आता चाहत्यांना आमिर खानच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. मात्र आमिरने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.