बॉलीवूडचे अनेक कलाकार मुलाखतींच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनेक किस्से सांगतात. अनेक बड्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. काही वेळा काही कलाकारांचे वाईट अनुभवही सांगितले जातात. आता अभिनेता आदि इराणीने एका मुलाखतीत सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. आदि इराणी प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांचा भाऊ आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान(Salman Khan)चे सेटवरील वागणे कसे होते आणि त्याने काय केले होते, याबद्दल आदि इराणीने खुलासा केला आहे.

माझी अवस्था फारच वाईट…

आदि इराणीने नुकतीच ‘फिल्मीमंत्रा मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने सलमान खानबरोबर ‘चोरी चोरी चुपके चुपके’मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. सलमान खानचा सेटवरील वावर असा होता की, त्याच्या अटींवर त्याला गोष्टी करायच्या आहेत. जर त्याला एखादी गोष्ट करायची नसेल, तर तो करत नसे. त्याचे हे वागणे उद्धट असण्यापेक्षा बालिश होते, असे आदि इराणीने म्हटले. पुढे सेटवरील किस्सा सांगताना अभिनेत्याने म्हटले, ” ‘चोरी चोरी चुपके चुपके’च्या शूटिंगदरम्यान त्याने माझ्यावर एक ग्लासची फ्रेम टाकली. त्या ग्लासच्या तुकड्यांमुळे माझ्या चेहऱ्याला इजा झाली. रक्त येत होते. माझी अवस्था फारच वाईट झाली होती. जर मी नकार दिला नसता, तर शूटिंग रद्द झाले असते. शूटिंग एक ते दोन महिने थांबवले असते आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले असते, मी निर्मात्यांचा विचार करून काम केले.”

जेव्हा इजा झाली तेव्हा सलमान खानची काय प्रतिक्रिया होती? यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले, “जेव्हा मला लागले. तेव्हा सलमान खान बाहेर उठून गेला. त्याने मला इजा झाल्याचे पाहिले होते. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे रक्त पाहिले होते; पण तो काहीच बोलला नाही. अगदी सॉरीही म्हटले नाही, तो तसाच उठून बाहेर गेला. तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शूटिंगसाठी सेटवर आलो तेव्हा त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले. सलमान खानने मला म्हटले की, आदि मला माफ कर. मी तुझ्या डोळ्यांतही पाहू शकत नाहीये. मला खूप वाईट वाटत आहे.” अभिनेत्याने पुढे म्हटले की, सलमान त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलला.

आदि इराणीने १९७८ ला तृष्णा या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांत सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. आमिर खानच्या दिल से, शाहरूख खानच्या बाजीगर, गोविंदाच्या अनाडी नंबर १, तसेच ‘वेलकम’सारख्या अनेक चित्रपटांत आदि इराणीने महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याबरोबरच, कसौटी जिंदगी की, सावित्री- एक प्रेम कहाणी, फिर कोई है, नागिन यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर सलमान खान लवकरच सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.