अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) हा त्याच्या चित्रपटांमुळे अनेकदा चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘स्काय फोर्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच, जया बच्चन यांनी त्याच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाच्या नावावर टीका केली होती. जर चित्रपटांची नावे अशी असतील तर लोक का चित्रपट पाहण्यास जातील. मी कधीच असे नाव असलेले चित्रपट पाहणार नाही, असेही जया बच्चन यांनी म्हटले आहे. आता अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आला आहे.

अक्षय कुमारला किती कोटींचा झाला फायदा?

अक्षय कुमारने मुंबईतील ओबेरॉय स्काय सिटीमधील दोन फ्लॅट विकले आहेत. ह मालमत्ता ६.६ कोटी रुपयांना विकली गेल्याचे समोर आले आहे. या दोन्ही व्यवहारांची नोंदणी मार्च २०२५ मध्ये झाली. स्क्वेअर यार्ड्सनुसार आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, अक्षय कुमारने नोव्हेंबर २०१७ मध्ये खरेदी केलेले एक अपार्टमेंट ५.३५ कोटी रुपयांना विकले. हे अपार्टमेंट त्याने २.८२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १०८० चौरस फूट आहे. ३२.१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले आहे. अक्षय कुमारची दुसरी प्रॉपर्टी ही तुलेनेने लहान आहे. ही प्रॉपर्टी २५२ चौरस फूट आहे. २०१७ मध्ये ६७. १९ लाख रूपयांना विकत घेतली होती. ही प्रॉपर्टी १. २५ कोटींना विकली आहे. अक्षय कुमारला ८६ टक्के फायदा झाला आहे. त्याला ७. ५ लाख रूपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे. तर नोंदणीसाठी ३० हजार रूपये नोंदणी शुल्क भरावे लागले आहे. अक्षय कुमारच्या या दोन्ही मालमत्ता ओबेरॉय स्काय सिटीमध्ये आहेत.

गेल्या वर्षी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मे महिन्यात ओबेरॉय स्काय सिटीमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. अक्षय कुमारच्या संपूर्ण भारतात अनेक मालमत्ता आहेत. नो ब्रोकरहूडनुसार, जुहूमधील डुप्लेक्स अपार्टमेंटशिवाय त्यांचा अंधेरीमध्येदेखील फ्लॅट आहे. गोव्यातदेखील त्यांचा एक बंगला आहे. तसेच मॉरिशस व कॅनडामध्येदेखील त्याचे अपार्टमेंट आहे.

अक्षय कुमारच्या कामाबाबत बोलायचे तर तो ‘केसरी २’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. याबरोबरच तो जॉली एलएलबी ३, हाऊसफुल ५, कन्नाप्पा, वेलकम टू द जंगल, भूत बंगला अशा चित्रपटांतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.