Superhit Bollywood Movie: आता कोणताही चित्रपट आला की त्याचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे कोटींमध्ये मोजलं जातं. बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांनी जगभरात ५००-१००० कोटी रुपये कमावणं आता सामान्य झालं आहे. याउलट अनेक चित्रपट असे असतात, ज्याचं बजेट कमी असतं पण ते बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून लक्ष वेधून घेतात.

सध्याच्या काळात एखाद्या मोठ्या स्टारचा चित्रपट येणार म्हटलं की सोशल मीडियावर प्रचंड हाइप तयार केली जाते. कलाकार देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रमोशनल इव्हेंट करतात. पण ४६ वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता, ज्याचं बजेट काही लाख रुपये होतं. मात्र त्याने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला होता.

१९७८ मध्ये आलेल्या या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्या आठवड्यात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण दुसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षक सिनेमा पाहायला येऊ लागले आणि नंतर त्याने बॉक्स ऑफिस गाजवलं. या चित्रपटाच्या यशामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. या चित्रपटातील जबरदस्त संवांदांची त्या काळी प्रचंड चर्चा झाली होती.

‘डॉन’च्या निर्मितीसाठी किती खर्च आला होता?

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल सांगत आहोत, त्याचं नाव ‘डॉन’ आहे. हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्र बारोट यांनी केले होते आणि नरिमन इराणी यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि प्राण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘डॉन’मध्ये अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका होती.

बॉक्स ऑफिसवर ५० आठवडे चाललेला चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ला सुरुवातीला खूप सामान्य प्रतिसाद मिळाला होता. पण वर्ड ऑफ माऊथमुळे हा सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचला. या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ तयार झाली होती. हा चित्रपट तब्बल ५० आठवडे थिएटरमध्ये राहिला. ५० आठवड्यांनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ७.२ कोटींची कमाई केली होती. त्याकाळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपये कमावणं ही खूप मोठी गोष्ट होती.

देव आनंद व धर्मेंद्र यांनी नाकारलेला सिनेमा

अमिताभ बच्चन यांच्याआधी देव आनंद, धर्मेंद्र व जीतेंद्र या तेव्हाच्या आघाडीच्या तीन अभिनेत्यांना ‘डॉन’ची ऑफर देण्यात आली होती. मात्र या तिघांनाही वेगवेगळ्या कारणांनी नकार दिला होता. त्यानंतर हा चित्रपट अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला. त्यांनी ‘डॉन’साठी होकार दिला आणि त्यांच्या करिअरमधील उत्तम सिनेमांच्या यादीत आयकॉनिक ‘डॉन’चा समावेश झाला. ‘डॉन’ युट्यूबवर पाहता येईल.