गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. साक्षी मलिक, विनेश फोगाट व बजरंग पुनियासह इतर कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंच्या या आंदोलनावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनीही यावर भाष्य केलं आहे.
मिथुन चक्रवर्ती नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांना कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. “जर तुम्ही दया आणि प्रेम या दृष्टीकोनातून पाहिलं, तर हे सगळं संपेल. पण कोणीच याप्रकारे बघायला तयार नाही. माझ्या हातात काही नाही,” असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “हे केंद्र सरकारच्या हातात नाही. राज्याने याकडे लक्ष दिलं पाहिजे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.” मिथुन चक्रवर्तींचं हे वक्तव्य चर्चेत आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून होत आहे. त्यांच्याविरोधात दिल्लीत कुस्तीपटूंकडून आंदोलन सुरू आहे. २९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. तेव्हा कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं होतं. यानंतर या सगळ्या कुस्तीगीरांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. हरिद्वार या ठिकाणी हे सगळे गेलेही होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.