गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांबद्दलच्या वादग्रस्त ट्वीटमुळे रिचा चड्ढा चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या या ट्वीटवरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. भारतीय सैन्याचा हा अपमान सगळ्यांच्याच चांगला जिव्हारी लागला असून रिचाच्या आगामी चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणीदेखील होत आहे. अक्षय कुमार केके मेननसारख्या बॉलिवूडमधील कलाकारांनी रिचाच्या या वक्तव्यावर टिप्पणी दिली आहे.

भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले होते. याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचाने रिट्वीट करत, “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील रिचाच्या या वक्तव्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे.

आणखी वाचा : “पाकिस्तानात काम करायला आवडेल”; पाच वर्षांपुर्वीच्या विधानावरून रिचा चड्ढा पुन्हा ट्रोल

अनुपम खेर यांनी ट्वीट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. ते म्हणतात, “देशाबद्दल वाईट बोलून काही लोकांना खुश करणारी व्यक्ती अत्यंत भित्री असते, आणि भारतीय सेनेविषयी इतकं अपमानकारक वक्तव्यं करणं याहून लाजिवारणी गोष्ट कोणतीच नाही.” रिचाच्या व्हायरल ट्वीटचा फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सगळं प्रकरण तापल्यावर रिचाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर माफी देखील मागितली, पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही. लोकांनी तिच्या या माफीवरही प्रचंड टीका केली आहे. नुकतंच रिचाने अली फजलशी लग्न केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. या वादग्रस्त ट्वीटमुळे नेटकरी तिचे जुने व्हिडिओ आणि वादग्रस्त विधानं पुन्हा शेअर करून तिच्यावर टीका करत आहेत.

Story img Loader