नुकताच अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला आहे. याच वर्षी अमिताभ आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा राजश्री प्रोडक्शनमध्ये बनलेला ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर फार सक्रिय आहेत. यावर ते सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे नवे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले. या पोस्टरद्वारे या चित्रपटातला त्यांचा लूक समोर आला होता. आता अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिनेते अनुपम खेर यांचाही या चित्रपटातील लूक समोर आला आहे. राजश्री फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आणि अनुपम खेर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
आणखी वाचा : “विकी माझ्यापासून लांब…” लग्नानंतर प्रथमच कतरिना कैफने व्यक्त केली खंत
हे पोस्टर शेअर करताना अनुपम खेर भावूक झाले आहेत. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “हे आहेत उंचाईमधील ओम शर्मा. सारांश पकडून राजश्री प्रोडक्शनबरोबर केलेला हा माझा पाचवा चित्रपट आहे. उंचाई चित्रपट करणं हा माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्यासाठी मी दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे मनापासून आभार मानतो.”
पोस्टरमध्ये अनुपम खेर यांचे २ वेगवेगळे लूक बघायला मिळत आहेत. करियरची सुरुवात राजश्रीपासूनच केल्याने अनुपम खेर यांना त्याबद्दल एक वेगळी ओढ आहे. खूप वर्षांनी सुरज बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्याबरोबरच बोमन इराणी, सारिका, डॅनी डेन्जोंगपा यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत, ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.