बॉलिवूडमध्ये शाहरुख खान या नावाला आणि त्या नावाभोवतालच्या वलयाला प्रचंड महत्त्व आहे. शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करणाऱ्या शाहरुख खानचं प्रत्येकाला कौतूक वाटतं, केवळ सर्वसामान्य माणसंच नव्हे तर बॉलिवूडमधील कित्येक अभिनेतेसुद्धा त्याचे चाहते आहेत. शाहरुख खानच्या मुंबईततील घराबाहेर म्हणजेच ‘मन्नत’बाहेर नेहमीच त्याच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. त्याच्या वाढदिवशी तर जगभरातून चाहते शुभेच्छा द्यायला त्याच्या घराबाहेर गर्दी करतात.
शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर येऊन फोटो काढतात, पण कधी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याने शाहरुखच्या घराबाहेर येऊन त्याच्या पोजमध्ये फोटो काढताना पाहिलं आहे. ही घटना नुकतीच समोर आली आहे. अभिनेता आयुष्मान खुराना याने नुकतंच शाहरुखच्या घराबाहेर दिसला आणि त्याने शाहरुखच्या पोजची नक्कलदेखील केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : प्रभासला डेट करण्यापूर्वी या अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलंय क्रिती सेनॉनचं नाव
आयुष्मान खुराना नुकताचा शाहरुखच्या घराच्या बाहेरून जात होता. वाटेत त्याने गाडी थांबवली आणि शाहरुखच्या गेटजवळ येऊन सनरुफ ओपन करून त्याने बाहेर येऊन सगळ्यांना अभिवादन केलं. तिथे शाहरुखचे काही चाहतेसुद्धा होते. तसंच गाडीतूनच त्याने शाहरुखची पोज देत चाहत्यांना खुश केलं. आयुष्मानदेखील शाहरुखचा मोठा फॅन आहे हे पाहून तिथली लोकही अचंबित झाली. शाहरुखच्या घराबाहेर आयुष्मानला पाहून प्रचंड गर्दी गोळा झाली.
आयुष्मान खुराना हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. त्याचे नवीन चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. आता आयुष्मान ‘अॅन अॅक्शन हीरो’ या चित्रपटात वेगळ्याच भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे. आयुष्मानचा हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.