बॉलिवूडमध्ये असे कित्येक अभिनेते आहेत ज्यांनी हातावर मोजण्याइतकेच चित्रपट केले अन् लोकप्रिय झाले, पण त्यापैकी प्रत्येकालाच ती लोकप्रियता टिकवता आली नाही. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेता डिनो मोरिया. ‘राझ’ या हॉरर चित्रपटामुळे डिनोला खरी ओळख मिळाली शिवाय या चित्रपटातील त्याची आणि अभिनेत्री बिपाशा बसूची केमिस्ट्रीसुद्धा लोकांना पसंत पडली. नंतर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली अन् कालांतराने डिनो मोरिया हे नाव विस्मरणात जाऊ लागलं.
नुकतंच ‘इटाइम्स’शी संवाद साधताना डिनोने आपल्या या पडत्या काळाबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर या मुलाखतीमध्ये त्याने यासाठी स्वतः कारणीभूत असल्याचंही सांगितलं आहे. केवळ पैसे मिळवण्यासाठी बऱ्याच चुकीच्या गोष्टींना होकार दिल्याचं डिनोने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : एकाच घरात राहतात श्रीवल्ली आणि अर्जुन रेड्डी? रश्मिकाच्या बर्थडे स्पेशल व्हिडिओने उलगडलं गुपित
याविषयी बोलताना डिनो म्हणाला, “माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी पैशाला जास्त महत्त्व दिलं. पैसा अधिकाधिक मिळावा याखातर मग माझी अभिनयातील गाडी रुळावरून घसरली ती कायमचीच. मी पैशासाठी हापापलो नव्हतो पण मला त्याची खूप आवश्यकता होती. मला माझ्यासाठी स्वतःचं एक घर घ्यायचं होतं. त्यामुळे तेव्हा कोणता चित्रपट करावा आणि कोणता करू नये याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही.”
‘राझ’ या चित्रपटामधून डिनो आणि बिपाशा यांच्या केमिस्ट्रीबद्दल बरीच चर्चा झाली. या दोघांनी बराच काळ एकमेकांना डेटही केलं, शिवाय आता हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत हेदेखील डिनोने या मुलाखतीमध्ये कबूल केलं. ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून डिनोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता काही वेबसीरिज आणि प्रादेशिक चित्रपटात डिनो काम करत आहे. ‘द एंपायर’ या वेबसीरिजमधील त्याच्या कामाची खूप प्रशंसा झाली.