९० च्या दशकात आपल्या बहारदार अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा बॉलीवूड अभिनेता म्हणजे गोविंदा. ‘मरते दम तक’, ‘किस्मत’, ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर १’, ‘आंटी नंबर १’ या आणि अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून गोविंदाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन् केलं आहे. त्याच्या विनोदी भूमिकांना तर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आपल्या अभिनयाने व नृत्याने चर्चेत राहणारा गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यापासून गोविंदा त्याची पत्नी सुनीता आहुजाबरोबर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. मात्र, गोविंदाच्या वकिलाने सुनीता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि आता त्यांच्यात सर्व काही सुरळीत असून, एकत्र राहत असल्याचे स्पष्ट केले.

सुनीतानेही हे दावे फेटाळून लावले. आपल्या मुलांसह वेगळ्या इमारतीत राहण्याबद्दल आणि गोविंदा त्याच्या बंगल्यात राहण्याबद्दलच्या वक्तव्यावर तिने स्पष्टीकरण दिले. अशातच आता या जोडप्याचा लिप-लॉक करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदाची पत्नी सुनीता त्याच्या शेजारी उभी आहे आणि त्यांची दोन्ही मुले टीना व यशवर्धनसुद्धा तिथे उपस्थित आहेत. एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान या जोडप्याचे प्रेमळ क्षण टिपणाऱ्या या विडिओमुळे आता त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये गोविंदा केक कापतो आणि त्यानंतर पत्नीला तो केकचा घास भरवतो.

त्यानंतर पत्नी सुनीता त्याला केकचा घास भरवते आणि गोविंदाला किस करते. पत्नीने गोविंदाला किस करताच त्यांच्या मुलांची अस्वस्थता या व्हिडीओमधून दिसून येत आहे. गोविंदा व पत्नीचा हा किसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता या व्हिडीओवरही नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “लोकांना प्रत्येक गोष्टीत समस्या असते”, “माहीत नाही लोक यावर उगाच का चर्चा करत आहेत, हा त्यांचा प्रेमळ क्षण आहे” तसंच “हे सगळे मिळून आपल्याला पागल बनवत आहेत” अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न मार्च १९८७ मध्ये झाले. ते जवळजवळ ३७ वर्षांपासून एकत्र आहेत. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. दोघांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, सुनीता गोविंदाबरोबरचे हे नाते संपवू इच्छिते. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र यावर सुनीता आहुजाने स्पष्टीकरण दिलं आहे. दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांनंतर आता या व्हायरल व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Story img Loader