सेलिब्रिटींबरोबर फोटो काढता यावा, त्यांना भेटता यावं यासाठी बरेच चाहते एअरपोर्टवर किंवा त्यांच्या शूटिंग सेटवर पोहोचतात. अशाच एका चाहत्याला बॉलीवूड अभिनेत्याने सेटवर झापड मारली होती. गोविंदाच्या सुपरहिट विनोदी चित्रपटांमुळे त्याचे जगभरात चाहते आहेत, त्याला भेटण्यासाठी चाहते खूप गर्दी करायचे. २००८ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर गोविंदाने संतोष राय नावाच्या माणसाला झापड मारली होती. यानंतर गोविंदा वादात अडकला होता. चाहत्याला मारल्या प्रकरणी तब्बल ९ वर्षे खटला चालला होता. यासंदर्भात आता गोविंदाने भाष्य केलं आहे.
संतोषने आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल ३-४ कोटी रुपये मागितले होते, असा खुलासा गोविंदाने केला. मुकेश खन्ना यांच्याशी बोलताना गोविंदा म्हणाला, “झापड मारण्याचे प्रकरण माझ्यासाठी लकी ठरले. कारण त्याने गैरवर्तन केलं आणि मी त्याला झापड मारली. हा खटला ९ वर्षे चालले आणि शेवटी, माझ्या एका मित्राने मला त्याच्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यास सांगितलं आणि तो जे काही बोलला ते रेकॉर्ड करण्यास सांगितलं.”
गोविंदाच्या मते, त्या माणसाने स्वत: ला ‘राक्षस’ म्हटलं आणि अभिनेत्याला ‘ईश्वर (देव)’ म्हटलं. “त्या व्यक्तीने मला खटला मागे घेण्यासाठी ३-४ कोटी रुपये मागितले. मी ते संभाषण रेकॉर्ड करून कोर्टात पाठवलं,” असं गोविंदाने सांगितलं.
मला कोणीच पाठिंबा दिला नाही – गोविंदा
संतोष नावाचा एक चाहता सेटवर एका महिलेशी गैरवर्तन करत होता, त्यानंतर रागाच्या भरात गोविंदाने त्याला झापड मारली होती. मग संतोषने गोविंदाने माफी मागावी अशी मागणी करत खटला दाखल केला. “त्याचं नाव संतोष होतं. बर्याच महिलांनी मला सांगितलं की त्याच्याशी वाईट वागू नकोस, त्याच्याशी मी आदराने वागावं असं त्यांनी सांगितलं. पण तिथे मला कोणीही पाठिंबा दिला नाही. जे तिथे माझ्यामुळे उभे होते तेच मला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते,” असं गोविंदाने नमूद केलं.

गोविंदाने २०१७ मध्ये तो चाहता व कोर्टासमोर लेखी दिलगिरी व्यक्त केली, त्यानंतर हे प्रकरण मिटले. गोविंदाकडून आर्थिक नुकसानभरपाई घेतली नाही, असं तो चाहता त्यावेळी म्हणाला होता.
दरम्यान, आता गोविंदा पुन्हा चित्रपटांकडे वळतोय. त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या आगामी तीन सिनेमांची घोषणा केली. ‘बाएं हाथ का खेल’, ‘पिंकी डार्लिंग’ आणि ‘लेन देनः इट्स ऑल अबाउट बिझनेस,’ अशी त्याच्या तिन्ही चित्रपटांची नावं आहेत.