सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई बघायला मिळत आहे. कतरिना-विकी, अलिया-रणबीर यांच्यापाठोपाठ नुकतंच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधनात अडकले. या सगळ्या स्टर्सच्या लग्नाची जबरदस्त चर्चा झाली. आता यांच्यानंतर हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसत आहे. हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काहीच दिवसांत हृतिकच्या नव्या अफेअरची चर्चा सुरू झाली.
या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिलं गेलं, बऱ्याच पार्टीजमध्येसुद्धा या दोघांचे एकत्र फोटो व्हायरल झाले. सोशल मीडियावर यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यावर आता त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतंच विमानतळावर हृतिकला सोडताना सबाने दिलेल्या गुडबाय कीसची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता मीडिया रीपोर्टनुसार हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘जेठालाल’च्या जीवाला धोका; अभिनेत्याच्या घराबाहेर वावरत आहेत गुंड
एका बॉलिवूड अपडेट देणाऱ्या ट्विटर हँडलवरुन हृतिक आणि सबा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची एक पोस्ट करण्यात आली. हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आणि यामुळेच या चर्चेला उधाण आलं आहे. रीपोर्टनुसार हृतिक अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमी लोकांच्या उपस्थितीतच लग्न करणार असून लग्नानंतर दोघेही एका मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची चर्चा आहे.
अर्थात याबद्दल हृतिक किंवा सबा या दोघांकडून पुष्टी झालेली नाही. सध्या या दोघांचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. २०१४ मध्ये हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या अफेअरबद्दल लोकांना माहिती झाली. करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी ते दोघे एकत्र मीडियासमोर आले आणि त्यांचं अफेअर असल्याचं स्पष्ट झालं. हृतिक सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.