‘सैराट’ या मराठी चित्रपटाने बॉलिवूडलाही भुरळ घातली. निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला अन् त्यात दोन स्टारकिड्सना लॉंच केलं. करण जोहरच्या या ‘धडक’ चित्रपटातून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर या दोघांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही, पण या दोन्ही नव्या कलाकारांना मात्र चांगलाच ब्रेक मिळाला.
जान्हवी कपूरला उत्तमोत्तम चित्रपट मिळत गेले, त्यामानाने इशान खट्टरला फारसे चांगले चित्रपट मिळाले नाहीत. इशान मध्यंतरी सिद्धांत चतुर्वेदी आणि कतरिना कैफबरोबर ‘फोन बूथ’मध्ये झळकला. ‘धडक’ आधी इशानने ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं, पण ‘धडक’मधून त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. नुकतंच इशानने यूट्यूबच्या ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
आणखी वाचा : KBC 15 : स्पर्धकाला व्हायचंय इन्कम टॅक्स ऑफिसर; तरुणाची इच्छा ऐकून अमिताभ बच्चन म्हणाले…
या मुलाखतीदरम्यान इशानने त्याची आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीबद्दलचा एक किस्सा सांगितला. इशान म्हणाला, “माझी आई अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सूर्यवंशम चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. तेव्हा मी बऱ्याचदा सेटवर जात असे, मी लहान होतो आणि अमितजी यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट पाहिला होता, त्यामुळे मी त्यांना लाडाने बडे मियां अशीच हाक मारायचो.”
इशानची आई निलिमा अजीम या सुद्धा अभिनेत्री होत्या आणि त्यांनाही आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता होती. याबद्दल इशान म्हणाला, “एखाद्या चांगल्या शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यावेळी मुंबईच्या ‘जमनाबाई शाळेत’ मला प्रवेश मिळाला तो केवळ अमिताभ बच्चन यांच्यामुळेच. त्यांनी माझ्यासाठी शाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शब्द टाकला अन् मला त्या शाळेत दाखला मिळाला.” असे अनेक किस्से इशानने या मुलाखतीदरम्यान उलगडले. इशान लवकरच आता एका आगामी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.