अयोध्येत काल (२२ जानेवारी) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची चर्चा रंगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफसुद्धा उपस्थित होते. सोहळ्यानंतर अभिनेत्याने केलेल्या एका कृतीचे सगळे कौतुक करत आहेत.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर जॅकी श्रॉफ मुंबईला परतण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर अभिनेता विवेक ऑबेरॉयही होता. यावेळी ऑबेराॅय पापाराझींना जॅकी श्रॉफ यांच्या रामभक्तीबाबत सांगताना दिसत आहे. विवेक म्हणाला, “जॅकी श्रॉफ सोहळ्याला अनवाणी आले अन् अनवाणी मुंबईला परत जात आहेत.” सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ व विवेक यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी जॅकी श्रॉफ यांच्या कृतीचे कौतुक केले आहे.
जॅकी श्रॉफ बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या अभिनयाबरोबर साधेपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये ते मुंबईतील राम मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ करताना दिसून आले होते. एवढंच नाही तर त्यांनी मंदिर परिसरातील कचराही गोळा केला होता. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत अभिनेत्याच्या या कामाचे कौतुक केले होते.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘मस्ती में रहने का’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका होती. तसेच दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.