बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक करण बुलानीच्या या सिनेमात चाहत्यांना भूमीचा जबरदस्त बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. नुकतंच भूमी पेडणेकरने ‘थँक यू फॉर कमिंग’च्या ट्रेलर लॉंचबद्दल खुलासा केला. नुकतंच आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून भूमीने तिच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे.
भूमीच्या या चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी प्रदर्शित होणार आहे. एकंदरच या चित्रपटाचं बोल्ड पोस्टर आणि भूमी पेडणेकरचा हटके अंदाज चर्चेत आहे. आता या पोस्टरबाबत आणि चित्रपटाच्या विषयाबाबत बॉलिवूड अभिनेता आणि समीक्षक केआरकेने वक्तव्य केलं आहे. कमाल आर खानने या चित्रपटावर टीका करत माहिती व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनाही आपल्या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.
केआरके आपल्या ट्वीटमध्ये लिहितो, ” हे पॉर्न नाही तर मग काय आहे? आणि अशा लोकांना तुम्ही पद्मश्री सारखे पुरस्कारदेऊन सन्मानित करता. हे अजूनही माझ्या पचनी पडत नाहीये. ही लोक चक्क पॉर्न विकून पैसे कमवत आहेत अन् हे स्वतःला सेलिब्रिटी म्हणवतात. हे अत्यंत लज्जास्पद आहे.”
केआरकेच्या या ट्वीटवर काहींनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरच्या माध्यमातून स्त्रिया आणि पुरुषांच्या ऑर्गेझममधील फरक आणि काही भ्रामक कल्पना दूर करायचा हटके प्रयत्नही केला आहे. एकंदर नाव, फर्स्ट लूक आणि पोस्टर्स यावरून हा चित्रपट ‘ऑर्गेझम’ या विषयावर भाष्य करणारा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भूमी पेडणेकरबरोबर या चित्रपटात कुशा कपिला, शहनाज गिल, शिबानी बेदी, डॉली सिंग, अनिल कपूर आणि करण कुंद्रा यांसारखे कलाकार दिसणार आहेत. ‘थँक यू फॉर कमिंग’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.