कांती शाह दिग्दर्शित ‘गुंडा’ हा चित्रपट आजही गिल्टी प्लेजर म्हणून कित्येक लोक आजही बघतात. ९० च्या दशकाच्या अखेरीस आलेला ‘गुंडा’ हा एक बी ग्रेड मसाला चित्रपट आहे, पण यात तुम्हाला चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार काम करताना पाहायला मिळतात. आजही या चित्रपटातील कित्येक वादग्रस्त डायलॉग लोकांना तोंडपाठ आहेत. अश्लील संवाद, दृश्य, हिंसा अन् बेताल कथा यामुळे हा चित्रपट तेव्हा फ्लॉप जरी ठरला असला तरी त्याची चर्चा मात्र भरपुर झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच या चित्रपटाबद्दल मुकेश ऋषी यांनी भाष्य केलं आहे. या चित्रपटात काम करणं ही मुकेश यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक वाटते. हा चित्रपट करायला त्यांनी होकार कसा दिला हेदेखील त्यांना ठाऊक नसल्याचा खुलासा मुकेश ऋषी यांनी केला. हा चित्रपट इंटरनेटमुळे चांगलाच चर्चेत आला याची माहिती मुकेश यांना चक्क सैफ अली खानने दिली होती.

आणखी वाचा : लक बाय चान्स: चंदेरी दुनियेचं बीटीएस

‘लेहरन रेट्रो’शी संवाद साधताना मुकेश म्हणाले, “चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झाल्यावरच माझ्या ध्यानात आलं की ही खूप मोठी चूक आहे. एका ज्येष्ठ अभिनेत्यानेही याबाबतीत माझ्याकडे तक्रार केली की मी असे चित्रपट का करतोय म्हणून. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर डिजिटल विश्वातील या चित्रपटाची क्रेझ होती. माझे पात्र बुल्ला हे किती लोकप्रिय आहे याची माहिती मला सैफ अली खानकडून मिळाली. मी आणि सैफ एका प्रोजेक्टसाठी हैद्राबादला जात असताना त्याने मला ‘गुंडा’च्या लोकप्रियतेबद्दल सांगितले.”

पुढे मुकेश म्हणाले, “आजच्या नव्या पिढीला हा चित्रपट पसंत पडला आहे. मी आज कुठेही गेलो की मला बुल्लाचे संवाद म्हणून दाखवण्याची फर्माईश केली जाते. जेव्हा मी हा चित्रपट करत होतो तेव्हा मी फार साशंक होतो, पण आजची पिढी अशा चित्रपटाकडे गमंत म्हणून वेगळ्याच दृष्टिकोनातून बघते. असाच बदल घडतो. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की हा चित्रपट लोकांना एवढा आवडेल अन् रिलीजच्या २० ते २५ वर्षांनी यावर एवढी चर्चा होईल.” ‘गुंडा’मध्ये मिथुन चक्रवर्ती, शक्ति कपूर, मुकेश ऋषी, रजाक खान, रामी रेड्डी, दीपक शिर्के, मोहन जोशी यांच्यासारखे नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor mukesh rishi speaks about gunda movie and its craze in youth avn