बॉलीवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करणं ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नाही. २० वर्षांपूर्वी अशाच एका अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली पण, आजवर ती एकाही हिट सिनेमात काम करू शकली नाहीये. या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा शर्मा. ती खूपच सुंदर दिसते परंतु, सध्या अभिनयाव्यतिरिक्त तिची वेगळ्या कारणासाठी चर्चा सुरू आहे.
नेहा शर्माचे वडील बिहारच्या राजकारणात सक्रिय आहेत. अजित शर्मा हे भागलपूरचे आमदार आहेत. लोकसभेचं बिगुल वाजल्यापासून नेहा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर यावर आता अजित शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित शर्मा माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “जर पक्षाने तसा निर्णय घेतला असता, तर नेहाने नक्कीच निवडणूक लढवली असती परंतु, सध्या ती चित्रपट व अन्य प्रोजेक्ट्सच्या कामात व्यग्र आहे. त्यामुळे नेहा ही निवडणूक लढवणार नाही. यात घराणेशाहीचा वगैरे मुद्दा येत नाही. कारण, तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल परंतु, नेहा निवडणूक लढवणार नाही.”
“भागलपूरची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे कारण तो आमचा बालेकिल्ला आहे, जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला ही जागा मिळाली तर कोणता उमेदवार उभा राहणार हे पक्षाच्या हायकमांड ठरवतील” असं अजित शर्मांनी सांगितलं.
दरम्यान, बॉलीवूडमध्ये पदार्पण करून आता नेहाला २० वर्षे झाली आहेत. चित्रपटसृष्टी व्यतिरिक्त ती सध्या टीव्ही आणि ओटीटीवर काम करत आहे. आता लवकरच अभिनेत्री ’36 डेज’ मध्ये झळकणार आहे.