‘फुले’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. ११ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलली गेली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी(Pratik Gandhi) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले होते. मांग, महार, पेशवाई हे शब्द या चित्रपटातून हटवण्यास सांगितले होते. तीन हजार वर्षे जुनी गुलामी यांसारखी वाक्ये काढण्यास सांगण्यात आले होते. सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले सगळे बदल केले गेले. १० एप्रिलला चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यानंतर ब्राह्मण समाजातील काहींनी चित्रपटावर आक्षेप घेतला. आता हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यावर अभिनेता प्रतीक गांधीने नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटाचा आशय न बदलता जे…
अभिनेता प्रतीक गांधी याने नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. तो चित्रपट प्रदर्शित होण्याच्या बदललेल्या तारखेबद्दल म्हणाला, “मी कुठेतरी शूटिंग करीत होतो आणि मला समजले की चित्रपट दोन आठवड्यांनी पुढे ढकलला गेला आहे. जेव्हा मी निर्मात्यांशी बोललो, तेव्हा मला कारणे समजली. ती अशी कारणे होती, ज्यावर आपला काही कंट्रोल नाही. मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टींसाठी वाटले की, ११ एप्रिलला महात्मा जोतिबा फुले यांची १९७ वी जयंती होती. जर तो चित्रपट त्याच तारखेला प्रदर्शित झाला असता, तर तो इतिहासाचा एक भाग झाला असता. ती तारीख महत्त्वाची होती; पण जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते.”
प्रतीक पुढे म्हणाला, “जे आवश्यक बदल करणे गरजेचे होते, ते आधीच केले गेले आहेत. चित्रपटाचा आशय न बदलता जे शक्य होते, ते बदल चित्रपटात केले गेले आहेत. काही लोकांना वाटत आहे की, हा चित्रपट त्यांच्या विचारसरणीविरुद्ध आहे.”
प्रतीक गांधीने ब्राह्मण समाजाने ट्रेलरवरून चित्रपटाबाबत अंदाज बांधू नयेत, अशी विनंती केली आहे. तो म्हणाला, “चित्रपटाच्या ट्रेलरवर आलेल्या प्रतिक्रियांचे मला आश्चर्य वाटले. मी त्या सगळ्यांना फक्त विनंती करीत आहे, की त्यांनी चित्रपट बघावा आणि त्यानंतर त्यांचे मत मांडावे. त्यांनी फक्त ट्रेलर पाहिला आहे.”
दरम्यान, याआधी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी चित्रपटात वादग्रस्त असे काही नाही. जे बदल करायचे होते, ते आधीच केले आहेत, असे स्पष्ट केले होते. महात्मा फुले यांना ब्राह्मणांकडून अन्याय्य वागणूक मिळाल्याचे एकांगी चित्रण या चित्रपटात असल्याचा दावा ब्राह्मण महासंघाने केला होता. फुले यांना स्त्री शिक्षणासाठी ब्राह्मण समाजाकडून मदतही मिळाली होती, त्याचा उल्लेख चित्रपटात नाही, असे सांगत काही गोष्टींवर महासंघाने आक्षेप घेतला. त्यानंतर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी चित्रपटात अशा पद्धतीने कुठल्याही समाजाचे एकांगी चित्रण करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले होते.