दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ‘अमरन’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता राहुल बोसनेदेखील काम केलं होतं. त्याने चित्रपटात कर्नल अमित सिंह डब्बास यांची भूमिका साकारली होती, जो मेजर मुकुंद वरदराजन (शिवकार्तिकेयन) यांचा कमांडिंग ऑफिसर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल बोसने चित्रपट आणि त्यातील कलाकारांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. हा चित्रपट पाहून १०-११ वेळा रडल्याचं राहुल बोसने सांगितलं.

राहुलने ‘अमरन’ सिनेमाचं केलं कौतुक

राहुल बोस म्हणाला, “ॲक्शन आणि प्रेम यांच्यातील दुवा इतक्या बारकाईने दाखवणारा असा कोणताही चित्रपट मी पाहिलाय, असं मला वाटत नाही. खरंच खूप दमदार ॲक्शन सीक्वेन्स आणि अतिशय भावनिक दृष्ट्या गुंतवून ठेवणारी प्रेमकथा एकत्र उलगडणं अवघड काम आहे. राजकुमार तुम्ही ते काम हुशारीने केलंय, तसेच अचूकपणे, संयमाने, शांततेने आणि पूर्ण आत्मविश्वासाने केलं आहे.”

चित्रपट पाहून रडला राहुल बोस

राहुलने अभिनेता शिवकार्तिकेयनचं कौतुक केलं आणि म्हणाला, “शिवकार्तिकेयन, तुझा अभिनय खूप चांगला आहे. जेव्हा एखादा अभिनेता पडद्यावर खरा असतो तेव्हा तुम्ही त्याच्यावरून नजर हटवू शकत नाही. ज्या क्षणी ते खोटे वाटतात, तेव्हा तुमचं त्यांच्याशी कनेक्शन तुटतं. तू माझं लक्ष वेधून घेतलंस. मी दोनदा चित्रपट पाहिला आणि मी किमान १० ते ११ वेळा रडलो असेन. खरं तर मी क्वचितच रडतो.”

साई पल्लवीबरोबर राहुलला करायचंय काम

“तू अविश्वसनीय आहेस. या चित्रपटात मी काम केलं, पण तुझ्याबरोबर सीन करण्याची संधी मिळाली नाही, पण मला आशा आहे की भविष्यात मला एखादा चित्रपट मिळेल ज्यात मी तुझ्याबरोबर एक-दोन सीन करेन,” असं राहुल बोस साई पल्लवीबद्दल म्हणाला.

राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ‘अमरन’ हा शिवा आरूर आणि राहुल सिंग यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज मोस्ट फियरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ या पुस्तकातील मेजर मुकुंद वरदराजन यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात मेजर मुकुंद (शिवकार्तिकेयन) आणि त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीस (साई पल्लवी) यांचा प्रवास आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.