अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लवकरच रणबीर ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. गेले कित्येक दिवस प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. पोस्टर प्रदर्शित केल्यावर आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्री-टीझरची घोषणा केली आहे.
हेही वाचा : “ते देवबाप्पाकडे का गेले?” क्रांती रेडकरच्या मुलीने रडून घातला गोंधळ, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
बहुचर्चित ‘अॅनिमल’चित्रपटाचा प्री-टीझर रविवारी ११ जूनला सकाळी बरोबर ११ वाजून ११ मिनिटांनी रिलीज करण्यात येणार आहे. याची घोषणा चित्रपट निर्माते भूषण कुमार यांच्यासह दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ट्विटरवर केली आहे. ‘अॅनिमल’चित्रपट अंडरवर्ल्ड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
हेही वाचा : “२५ हजार कोटींचा धनादेश अन्…” ‘द केरला स्टोरी’नंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा
चित्रपटाबाबत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला, “या चित्रपटात प्रेक्षकांना क्राइम, ड्रामा आणि पिता-पुत्राची गोष्ट पाहायला मिळणार आहे. ही माझ्यासाठी एक नवी भूमिका असणार आहे.” या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ही ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा हा दुसरा हिंदी चित्रपट असेल. यापूर्वी त्यांनी शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटासाठी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.
‘अॅनिमल’हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल. रणबीरच्या ‘अॅनिमल’चित्रपटाबरोबर सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ चित्रपट रिलीज होईल त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल कोणता चित्रपट बाजी मारेल? याची उत्सुकता आतापासून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.