‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. आता प्रेक्षकांसह कलाकारदेखील चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंहने आता कल्की २८९८ एडी हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाबरोबरच पत्नी दीपिकाचेदेखील कौतुक केले आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ आठवडा उलटून गेल्यानंतर रणवीर आणि दीपिका चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडले होते. चित्रपट पाहून आल्यानंतर पापाराझींनी जेव्हा त्यांना विचारले, तेव्हा रणवीरने चित्रपट उत्तम असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करीत चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्की २८९८ एडी हा उत्तम चित्रपट आहे. मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटाचे ‘कल्की २८९८ एडी’ उत्तम उदाहरण आहे. चित्रपटात तांत्रिक भागावर ज्या कौशल्याने काम केले आहे, ते अविश्वसनीय आहे. भारतीय चित्रपटांतील हा अत्यंत उच्च दर्जाचा चित्रपट आहे. नागी सर आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!

तसेच रणवीरने प्रभास, कमल हासन व अमिताभ बच्चन यांचेदेखील कौतुक केले आहे. प्रभासने आपल्या अभिनयाद्वारे भूमिकेला न्याय दिल्याचे त्याने म्हटले आहे. कमल हासन यांना कायम सर्वोत्तम असणारा अभिनेता म्हटले आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खास ओळी लिहिल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, तुम्हीदेखील माझ्यासारखे अमिताभ बच्चन यांचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघा.
दीपिकाच्या कामाबद्दल रणवीर लिहितो, ” दीपिका, तू तुझ्या प्रतिभेने चित्रपटातील भूमिकेची उंची वर नेली आहेस. त्या प्रत्येक क्षणात मार्मिकता, काव्यमयता व शक्ती आहे. तू तुलनेच्या पलीकडे आहेस. खूप प्रेम!” असे म्हणत रणवीरने कल्की या चित्रपटात दीपिकाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करीत आपले प्रेम व्यक्त केले आहे. रणवीर सिंग वेळोवेळी दीपिकाला प्रोत्साहन देताना दिसतो. बॉलीवूडचे हे लाडके जोडपे जेव्हा ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांनी काळ्या रंगाचे एकमेकांना मॅचिंग ठरणारे कपडे परिधान केले होते.

रणवीर सिंह ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

दरम्यान, ‘ कल्की २८९८ एडी’ चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, दुलकिर सलमान, मृणाल ठाकूर, दिशा पटानी व विजय देवरकोंडा या दिग्गज कलाकारांनी अभिनय केला आहे.