अभिनेते अनेकदा त्यांच्या भूमिकेच्या मागणीनुसार शारीरिक बदल करतात. वजन घटवणे किंवा वाढवणे हा त्यातला मुख्य भाग असतो. बॉलीवूड अभिनेता आमिर खानने ‘गजनी’ आणि ‘दंगल’ सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या शरीरावर घेतलेली मेहनत लक्षवेधी ठरली होती. हॉलिवूड अभिनेता जोक्विन फिनिक्सने जोकरमधील त्याच्या भूमिकेसाठी बरंच वजन कमी केलं होतं. अशा शारीरिक बदलांसाठी अनेकदा कठोर डाएट फॉलो करावे लागते, या डाएटमुळे इतरही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.
सायरस ब्रोचाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता रोहित रॉयने २००७ मध्ये आलेल्या त्याच्या ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेची तयारी करताना डाएट कसा फॉलो केला, त्याबद्दल सांगितलं. खूपच कडक डाएट केल्याने त्याचा शरीरावर खूप परिणाम झाला, असं रोहितने नमूद केलं. “खरं तर मी अत्यंत मूर्खासारखा डाएट घेतला होता आणि मी पुन्हा कधीही मी तसं करणार नाही. मला अशक्त दिसायचं होतं. मी २५-२६ दिवसांत १६ किलो वजन कमी केलं. मी फक्त पाण्याच्या डाएटवर होतो आणि ते खरोखरच खूप अती होतं,” असं रोहित म्हणाला.
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
अशा डाएटमुळे होणाऱ्या जोखमींबद्दल रोहित म्हणाला, “होय, हे अवयवांसाठी खूप धोकादायक आहे आणि म्हणूनच मी याला मूर्ख डाएट म्हटलं आहे. मी असे डाएट पुन्हा कधीच, कशासाठीही करणार नाही. मी हॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत, जे असाच डाएट घेतात, पण अनेकांना अशा डाएटच्या प्रक्रियेत जीव गमवावे लागले आहेत.”
सोशल मीडियावर आजकाल असे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे फिटनेस टिप्स देतात. सोशल मीडियावरून फिटनेस टिप्स घेण्याच्या धोक्यांवरही रोहितने प्रकाश टाकला. त्याने चाहत्यांना याबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच कलाकार ऑनलाइन काय सांगतात, यावर विश्वास ठेवू नका, असं त्याने सांगितलं. “डाएट रुटीनमधून बाहेर पडण्यासाठी देखील खूप संघर्ष करावा लागतो. त्याचा तुमच्यावर मानसिकरित्या परिणाम होतो. कारण तुम्ही डाएट करताना त्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहत असता. डाएट पूर्ण झाल्यावर तुम्हाला नेहमी एका विशिष्ट प्रकारे दिसायचं असतं. पण ते कायमस्वरुपी नाही. तुमचे शरीर कायम त्या विशिष्ट प्रकारचे राहूच शकत नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो, माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जे दिसतंय त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका; कारण मी तिथे माझे बेस्ट व्हर्जन चाहत्यांना दाखवत असतो,” असं तो म्हणाला.
‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ हा चित्रपट अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात विवेक ओबेरॉय, तुषार कपूर आणि इतरांनीही प्रमुख भूमिका केल्या होत्या.