बॉलीवूडच्या दुनियेत अनेकांनी आपलं नशीब आजमाजवलं. यामधील काही जण सुपरहिट झाले. तर काहीजण फ्लॉप ठरले. त्यापैकी एक म्हणजे साहिल खान. ‘स्टाइल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ यांसारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झोतात आलेल्या साहिल खान एकेकाळी तरुणींना क्रश होता. पण काही काळानंतर तो गायबचं झाला. कुठे दिसलाच नाही. बॉलीवूडनंतर त्याने थेट व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं. फिटनेससंबंधित साहिलने स्वतःचा ब्रँड सुरू केला; जो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. गेल्यावर्षी साहिल खानने दुसरं लग्न केलं. या लग्नाला वर्ष पूर्ण होताच त्याच्या पत्तीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचं समोर आलं आहे.
साहिल खानच्या दुसऱ्या पत्नीचं नाव मिलेना एलेक्जेंड्रा आहे. मिलेनानेचं इस्लाम धर्म स्वीकारला आहे. याबाबत साहिल खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे. साहिलने मिलेनाबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं की, माझी पत्नी मिलेना एलेक्जेंड्राने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करताना मला खूप अभिमान वाटतं आहे. या सुंदर प्रवासासाठी अल्लाहू अकबर! अल्लाह हमें माफ करे आणि हमारी दुआएं कबूल करे.
साहिलची दुसरी पत्नी मिलेना फक्त २२ वर्षांची आहे. जेव्हा साहिलने २०२४मध्ये मिलेनाशी युरोप येथे लग्न केलं तेव्हा ती २१ वर्षांची होती. साहिल आणि मिलेनामध्ये २६ वर्षांचं अंतर आहे. याआधीने साहिलने २००३मध्ये निगार खानबरोबर लग्न केलं होतं. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. साहिल व निगारने २००५ साली घटस्फोट घेतला.
दरम्यान, साहिल खानच्या पोस्टवर बऱ्याच नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “जर ती तुझ्यावर खरंच प्रेम करत आहे. तर तिला इस्लाम धर्म स्वीकारणं गरजेचं आहे का? जर तू तिच्यावर खरं प्रेम करत आहेस. तर मग तू ख्रिश्चन धर्म स्वीकारू शकत नाहीस का? मला धर्म परिवर्तन करण्याबाबत काहीही समस्या नाहीये. पण मी असंच विचारत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, लग्नानंतर धर्म परिवर्तन करणं गरजेचं आहे का?
हेही वाचा – Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
साहिल खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २००१मध्ये ‘स्टाइल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्रॉस’, ‘अलादीन’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केलं. पण त्याला बॉलीवूडमध्ये फारस यश मिळालं नाही. सध्या साहिल एक व्यावसायिक आहे. त्याच्या अनेक जीम आहेत. याशिवाय साहिलची स्वतःची एक कंपनी आहे; जी फिटनेस सप्लीमेंट्स बनवण्याचं काम करते. आता साहिल अभिनय कमी आणि फिटनेस ट्रेनर म्हणून अधिक काम करतो.