अभिनेता संजय दत्त हा अभिनेत्री नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा. बॉलिवूडमध्ये त्याला संजूबाबा म्हणून ओळखलं जातं. ‘खलनायक’, ‘वास्तव’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हसीना मान जायेगी’ या आणि अशा अनेक चित्रपटांमधून काम करत त्याने आपला एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली होती. तसंच एक काळ असाही होता जेव्हा संजय दत्त अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. आज मातृदिनानिमित्त संजय दत्तने त्याची आई आणि अभिनेत्री नर्गिस यांचा फोटो पोस्ट करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. जी वाचून चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय दत्त इंस्टाग्रामवर लिहिली पोस्ट

संजय दत्तने त्याची आई नर्गिस यांचा फोटो पोस्ट करत त्याबरोबर पोस्ट लिहिली आहे. ज्यावर चाहतेही व्यक्त होत आहेत. सर तुम्हाला नेहमीच तुमच्या आई वडिलांची आठवण येत असते असं एका चाहत्याने म्हटलं आहे. तर तुम्ही लिहिलेली पोस्ट वाचून माझ्या डोळ्यांत पाणी आलं असं एकाने लिहिलं आहे. एकाने लिहिलं आहे संजू बाबा तू आईला जितकं मिस करतोस तितकं कुणीही करत नाही. संजय दत्तच्या भावनिक पोस्टवर लोकांनी अशा प्रकारे भावनिक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजू बाबा तुझ्याबाबत आमचा आदर वाढला आहे असंही काही चाहत्यांनी लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहेत.

हे पण वाचा- संजय दत्त नाही तर ‘हा’ अभिनेता होता ‘मुन्नाभाई’साठीची पहिली पसंत, तर ‘या’ मराठी कलाकाराने नाकारली ‘सर्किट’ची भूमिका

काय आहे संजय दत्तची पोस्ट?

“प्रेम कसं करायचं हे मी ज्या व्यक्तीकडून शिकलो ती व्यक्ती म्हणजे माझी आई. माझ्या आयुष्यातल्या या खास महिलेला मातृदिनाच्या शुभेच्छा. शांततेत आयुष्य कसं जगायचं हे मी आईकडूनच शिकलो आहे. आई तुझे खूप खूप आभार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” या आशयाची पोस्ट संजय दत्तने लिहिली आहे.

नर्गिस दत्त संजूचा पहिला सिनेमाही पाहू शकल्या नाहीत

अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं निधन ३ मे १९८१ ला मुंबईतल्या एका रुग्णालयात झालं. त्यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्या अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेऊन परतल्या होत्या. ६ मे १९८१ ला ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा रिलिज झाला. ५ मे १९८१ च्या प्रीमियरला त्या हजेरी लावणार होत्या. मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा गहिरा परिणाम संजय दत्तच्या आयुष्यावर झाला होता. मात्र संजय दत्तचा रॉकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor sanjay dutt emotional post on mothers day 2024 shared an old photo with a special note scj