हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या नावांचा समावेश नक्कीच असेल. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील दोन सुपस्टार आहेत. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. पण एकदा शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांच्या महानतेबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर शाहरुख खानला ऑन कॅमेरा अमिताभ बच्चन यांची माफी मागावी लागली होती.
शाहरुख खान आपल्या अभिनयाबरोबच आपल्या वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत असतो. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शाहरुख खानने रजत शर्माच्या ‘आपकी अदालत’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्या वेळेस किंग खानला अमिताभ बच्चन यांच्या महानतेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळेस शाहरुख खानने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शाहरुख म्हणाला होता, “ते महान असतील, पण मी महानतेपेक्षा थोडा चांगला आहे.” या वक्तव्यानंतर शाहरुखला अमिताभ बच्चन यांची माफी मागावी लागली होती.
काही वर्षांनंतर ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहरुख खानने पुन्हा आपकी अदालत कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्या वेळेस त्याने पूर्वी अमिताभ बच्चन यांच्या महानतेवरून केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. “तो माझा बालिशपणा होता. आणि बालिशपणात अशा गोष्टी होतात. लहान समजून मला माफ करा. तरुण वयात अतिआत्मविश्वासामुळे माणूस चुका करतो. शिक्षणाच्या अभावामुळे मी हे वक्तव्य केले,” असे म्हणत शाहरुखने अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती.