बॉलिवूडचा शाहरुख खान आज त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत शाहरुखच्या बंगल्यासमोर २ नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातूनही त्याचे चाहते त्याला शुभेच्छा द्यायला येतात. आज या ठिकाणी पोचण्यासाठी शाहरुखने प्रचंड मेहनत घेतली आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. दिल्लीवरून एका सामान्य कुटुंबातून मुंबईत अभिनयात करियर करण्यासाठी आलेल्या या मुलाने आज जगभरात त्याचं आणि भारताचं नाव मोठं केलं आहे, पण आजच्या या सुपरस्टारने एकेकाळी स्वतःच्या चित्रपटाची तिकीटं तिकीटबारीवर विकली होती.
एका मुलाखतीमध्ये शाहरुखने सांगितलं होतं की त्याच्या मनाच्या जवळचा चित्रपट म्हणजे कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेला ‘कभी हां कभी ना’. हा चित्रपट शाहरुखने त्याच्या स्ट्रगलिंगच्या दिवसांत केला होता. शाहरुखला जेव्हा या चित्रपटासाठी विचारणा झाली तेव्हा त्याने तडख यासाठी होकार दिला कारण तो कुंदन शहा यांच्या कामाचा खूप मोठा चाहता होता. शाहरुख या चित्रपटाच्या आणि कथेच्या एवढ्या प्रेमात होता की या चित्रपटाचे हक्कदेखील त्याने स्वतःकडे ठेवले होते.
आणखी वाचा : ‘पठाण’च्या टीझरसाठी चाहते उत्सुक; दीपिका आणि शाहरुखचे नवे फोटो व्हायरल
या चित्रपटासाठी शाहरुखला २५००० रुपये मानधन मिळालं होतं. एवढंच नाही तर मुंबईत जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा शाहरुखने पहिल्याच दिवशी तिकीट काउंटरवर उभं राहून स्वतः या चित्रपटाची तिकिटे विकली होती. कुंदन यांनी स्वतः कित्येकदा ही गोष्ट मान्य केली आहे की जर शाहरुख नसता तर हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचलाच नसता.
या या चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर सूचित्रा कृष्णमूर्ति, आशुतोष गोवारीकर, दीपक तिजोरी, नसीरुद्दीन शाह, सतीश कौशिक असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाची गाणीदेखील चांगलीच हीट ठरली होती.