बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’, ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर ‘डंकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख बरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण किंग खानच्या या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित चित्रपटाचं नाव ‘डंकी’ का ठेवण्यात आलं? हे माहितीये का? यामागचं कारण अभिनेत्याने स्वतः सांगितलं आहे.
नुकतच शाहरुख खानने एक्सवर (ट्वीटर) ‘आस्क एसआरके’ सेक्शनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी शाहरुखला त्याच्या केसांपासून ते त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाविषयी अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने मजेशीर अंदाजात उत्तर दिली.
एका चाहत्याने त्याला विचारलं की, चित्रपटाच नाव ‘डंकी’ ठेवण्यामागचं कारण सांगू शकतोस? या प्रश्नाच उत्तर देत शाहरुख म्हणाला, “दोन देशांदरम्यान असलेल्या सीमेवरील होणाऱ्या अवैध प्रवासाला ‘डंकी’ म्हटलं जात. याचा उच्चार हंकी, फंकी सारखा असतो.”
शाहरुख खानने दिलेल्या या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका नेटकऱ्याने शाहरुखच्या या उत्तरावर लिहीलं , “शाहरुख याच अंदाजामुळे तो इतरांपेक्षा वेगळा असल्याचं कळतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, “तुझा हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत.”
हेही वाचा – हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमधील ६ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…
दरम्यान, शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ प्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय की नाही? हे येत्या काळात समजेल.