‘बीसीसीआय’चे अध्यक्ष यांनी घेतलेल्या समान मानधनाच्या निर्णयाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटपटू यांना मिळणाऱ्या समान फीबाबत घेतलेल्या निर्णयाचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे. पुरुष क्रिकेटपटूंना कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी२० सामन्यासाठी ३ लाख रुपये मानधन दिलं जातं. आता महिला क्रिकेटपटूंनादेखील एवढंच मानधन मिळणार असल्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे.
बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांनी या निर्णयाची प्रशंसा केली आहे. अनुष्का शर्मा, तापसी पन्नू या अभिनेत्रींनीदेखील या निर्णयाचं आनंदाने स्वागत केलं आहे. आता बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खाननेही या निर्णयाचं कौतुक केलं आहे. जय शहा यांच्या निर्णयाच्या ट्वीटला उत्तर देत शाहरुखने या निर्णयाचा खुल्या मनाने स्वागत केलं आहे.
आणखी वाचा : बहुचर्चित ‘तणाव’चा ट्रेलर प्रदर्शित; ‘द काश्मीर फाईल्स’ पाठोपाठ आता उलगडणार काश्मीरची दुसरी बाजू
याबद्दल ट्वीट करताना शाहरुख म्हणाला, “बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय म्हणजे एक उत्तम फ्रंट फूट शॉट आहे. या निर्णयामुळे खेळात योग्य समोतोल राखला जाईल. शिवाय या निर्णयाबद्दल ऐकून इतरही देशात याचा पाठपुरावा केला जाईल आणि त्या त्या देशातही असे निर्णय घ्यायला मार्ग मोकळा होईल.” भारतीय महिला क्रिकेट टीमने जिंकलेल्या आशिया कपचा फोटो शेअर करत जय शहा यांनी समान वेतन हा नियम लागू करत असल्याची बातमी दिली.
क्रिकेटविश्वात झालेला हा बदल फारच सकारात्मक आहे आणि हळूहळू इतरही क्षेत्रात असेच नियम लागू होतील अशी आशा आहे. सोशल मीडियावर सगळ्यांनीच या निर्णयाचं खूप कौतुक केलं आहे. महिला क्रिकेटपटूंनादेखील या निर्णयामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याच्या निर्णयाची सुरुवात प्रथम न्यूझीलँड क्रिकेट बोर्डने केली होती.