ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. २१ जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट यांची कहाणी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच बॉलीवूड क्यूट कपल म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यासंबंधीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सिद्धार्थनेही ‘ओपनहायमर’च्या दिग्दर्शकाविषयी भाष्य केलं आहे.
‘ओपनहायमर’ या चित्रपटाची भुरळ फक्त सर्वसामान्यांच नाही, तर बॉलीवूडच्या कलाकारांनाही पडली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर आणि रणबीर कपूर हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेरील या दोघांचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता सिद्धार्थ आणि कियाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अलीकडेच सिद्धार्थ पत्नी कियाराबरोबर ‘ओपनहायमर’ चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. दिल्लीतील एका चित्रपटागृहाबाहेर सिद्धार्थ काळ्या रंगाच्या स्वेटशर्ट आणि डेनिम कार्गोमध्ये अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसला, तर यावेळी कियारा पांढऱ्या रंगाच्या टँक टॉपवर गुलाबी श्रग आणि ट्राऊजरमध्ये होती. सिद्धार्थ आणि कियाराचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – “हॉलीवूड अमूक, हॉलीवूड तमूक…”, शाहीद कपूरच्या पत्नीचे ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य; म्हणाली…
दरम्यान, अभिनेत्याने ‘ओपनहायमर’ हा चित्रपट पाहून झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर ‘ओपनहायमर’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करून लिहिलं आहे की, “ख्रिस्तोफर नोलन यांची उत्कृष्ट कलाकृती.”
हेही वाचा – Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातून पूजा भट्ट बाहेर? जाणून घ्या कारण
‘ओपनहायमर’च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदीत डब असलेल्या या चित्रपटाने सात कोटी, तर इंग्रजीत असलेल्या चित्रपटाने जवळपास ४८ कोटींची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात ख्रिस्तोफर यांच्या या चित्रपटाने १,४६० कोटी एकूण गल्ला जमवला आहे.