अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जूनला झहीर इक्बालबरोबर लग्न केलं. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सोनाक्षीने झहीरबरोबर नोंदणी पद्धतीने लग्न केलं. दोन्ही कुटुंबियांच्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न झालं होतं. त्यानंतर लग्नाच्या रात्री रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्यात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सोनाक्षीचं लग्न होऊन आज १३ दिवस पूर्ण झाले आहेत. अशातच तिने आईच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
सोनाक्षी सिन्हाने लग्नातील काही फोटो शेअर करून भावुक पोस्ट लिहिली आहे. पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री आईला मिठी मारून रडताना दिसत असून दोघींच्या मागे शत्रुघ्न सिन्हा उभे आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी शत्रुघ्न सिन्हा यांच्या खांद्यावर डोकं टेकवून भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये मायलेकी हसताना दिसत आहेत. तर चौथ्या फोटोमध्ये लग्नानंतर आई-बाबांना मिठी मारताना सोनाक्षी पाहायला मिळत आहे. लग्नातील हे खास क्षण शेअर करत सोनाक्षीने आईच्या आठवणीत सुंदर पोस्ट लिहिली आहे.
हे फोटो शेअर करत सोनाक्षीने लिहिलं आहे, “जेव्हा लग्नात आईला जाणवलं की, मी आता घर सोडून जात आहे, तेव्हा ती रडू लागली. मी तिला सांगितलं, आई काळजी करू नको…जुहूपासून वांद्रे २५ मिनिट दूर आहे. आज तिची जरा जास्तच आठवण येतं आहे. कारण स्वतःशी देखील मी हेच बोलत आहे. आज म्हणजे रविवारी घरी सिंधी कढी बनवली असेल…लवकरच मी भेटेन… झूम झूम झूम.” सोनाक्षी सिन्हाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं होतं की, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आहे. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही नवरा आणि बायको झालो आहोत…सोनाक्षी आणि झहीर…२३.०६.२०२४”