सुनील शेट्टी हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण एक यशस्वी उद्योजकही आहे. त्याचे पॉपकॉर्न एंटरटेनमेंट नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. याशिवाय सुनील शेट्टी हॉटेल चेन आणि कॅफे या व्यवसायातही कार्यरत आहे. याबरोबरच त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे. नुकतंच सुनील शेट्टीने शहनाज गिलच्या ‘देसी वाइब्स’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने अभिनयाबरोबरच इतर व्यवसायात का नशीब आजमावलं याबद्दल भाष्य केलं आहे.
शहनाजशी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाला की, “मी सुरुवातीपासूनच उद्योजक होतो. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. जेव्हा मला अभिनयाची संधी मिळाली तेव्हा माझे वडील म्हणाले की प्रयत्न कर आणि माझे चित्रपट हीटसुद्धा झाले, पण समीक्षकांनी मात्र माझ्यावर सडकून टीका केली. मला अभिनय येत नाही असे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आलं. अशा स्थितीत ही अभिनय क्षेत्रात आपला निभाव कीती काळ लागेल अशी भीती आतमध्ये होती. म्हणूनच मी माझा व्यवसाय कधीही सोडला नाही कारण तुम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खंबीर असणे खूप महत्वाचे आहे.”
आणखी वाचा : ओटीटी विश्वात शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ने रचला इतिहास; लोकप्रिय वेबसीरिजना मागे टाकत मोडला ‘हा’ रेकॉर्ड
याबरोबरच सुनील शेट्टीला मिळालेल्या अॅक्शन हीरो या टॅगबद्दलही त्याने भाष्य केलं आहे. तो म्हणाला “अभिनय हेच माझे करिअर आहे असे वाटताच मी फक्त इतर व्यवसायात गुंतवणूक करत होतो. मनोरंजन विश्वात एकदा तुम्हाला एखादं बिरुद मिळालं कि ते कायम तुमच्याबरोबरच असते. मला अॅक्शन हिरोचा टॅग मिळाल्याचा मला आनंद आहे, त्यामुळे मी इतकी वर्षे टिकून आहे. त्यात चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टीही आहेत.”
सुनील शेट्टी सध्या ‘हंटर’ या वेबसीरिजमध्ये दिसत आहे. शहनाज गिलही तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये शहनाजची झलकही पाहायला मिळाली होती. याबरोबरच सुनील शेट्टी मध्यंतरी ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमध्येही झळकला होता, त्याच्या या वेबसीरिजमधील भूमिकेचंही कौतुक झालं.