Sunny Deol Viral Dance Video: सनी देओल सध्या ‘जाट’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आज सनी देओलचा हा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘जाट’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दोन वर्षांनंतर सनी देओलने ‘जाट’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं आहे. ‘जाट’च्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता राजस्थानच्या तनोट मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘जाट’ चित्रपटाला यश मिळण्यासाठी सनी देओलने तनोट मातेचे आशीर्वाद घेतले. या मंदिरातील मातेला ‘सैनिकांची देवी’ म्हटलं जात. भारत-पाकिस्तान सीमा रेषेवरील हे शेवटचं हिंदू मंदिर आहे. या मंदिरातील मातेचे आशीर्वाद घेतल्यानंतर सनी देओल बीएसएफच्या जवानांबरोबर थिरकताना पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सनी देओलच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सनी स्वतःच्या चित्रपट ‘गदर’मधील सुपरहिट गाणं ‘मैं निकला गड्डी लेके’वर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं जवान गाताना पाहायला मिळत आहे. तसंच सनीबरोबर बीएसएसफचे जवान थिरकतही आहेत.
#WATCH | Rajasthan: Actor Sunny Deol visited Tanot Mata Temple in Jaisalmer to offer prayers for the success of his upcoming film Jaat; danced with BSF jawans on a song from one of his films 'Gadar: Ek Prem Katha' (09.04)
— ANI (@ANI) April 9, 2025
(Visuals source: BSF) pic.twitter.com/cjVtkFFYil
दरम्यान, सनी देओलचा ‘जाट’ चित्रपटाआधी २०२३मध्ये ‘गदर २’ प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. २०२३मधील देशातील सर्वाधिक कमवणारा चित्रपट ‘गदर २’ होता. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘गदर २’ चित्रपटाने देशभरात ५२५.७ कोटींचा व्यवसाय केला होता. तर जगभरात ६८६ कोटींची गल्ला जमवला होता. त्यामुळे ‘गदर २’ प्रमाणे सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला होता.
तनोट मंदिराचं सनी देओलशी आहे खास कनेक्शन
राजस्थानच्या तनोट मंदिराचं सनीच्या ‘बॉर्डर’ चित्रपटाशी खास कनेक्शन आहे. या मंदिराची झलक ‘बॉर्डर’ चित्रपटात दाखवण्यात आली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तनोट माता मंदिरावर गोळीबार झाला होता. ही घटना ‘बॉर्डर’ चित्रपटात दाखवण्यात गेली होती. या चित्रपटात सनी देओलने मेजर कुलदीप सिंह चांदपुरीची मुख्य भूमिका साकारली होती.
सनीच्या ‘जाट’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर, या चित्रपटातील बरेच सीन कापण्यात आले आहेत. एकूण २२ बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शिव्या, अपशब्दांसह बरेच हिंसक सीन्स होते, जे आता बदलण्यात आले आहेत. महिला निरीक्षकाच्या छेडछाडीचे दृश्य देखील हटवून लहान सीन करण्यात आला आहे. असं असलं तरी ‘जाट’ चित्रपटाविषयी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया चांगल्या उमटल्या आहेत. सनीच्या आजवरच्या करिअरमधील ‘जाट’ चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचं काहींनी सांगितलं आहे. तर काहींनी दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे ‘जाट’ असल्याचं म्हटलं आहे.