बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक आणि रिमेक यांचीच हवा आहे. वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट हिंदीत रिमेक केले जात आहेत. काहींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे, तर काही चित्रपट सणकून आपटले आहेत. आमिर खानच्या चित्रपटाची झालेली अवस्था आपण पाहिली आहेच. आतासुद्धा अशाच एका रिमेकची चर्चा आहे, यावेळी मात्र हॉलिवूड आपल्या बॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक करणार आहेत.
निर्माता विपुल शहा यांचा आणि अभिनेता विद्युत जामवाल अभिनीत ‘सनक’ हा चित्रपट गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी चित्रपटाला बरा प्रतिसाद दिला. विद्युतचे स्टंट आणि साहसदृश्यांचं खूप कौतूक झालं. एकूणच या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद ओटीटीवर मिळाला. आता याच चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
आणखी वाचा : Photos : १८ वर्ष संगीतक्षेत्रापासून लांब का राहिल्या अनुराधा पौडवाल? एक निर्णय घेतला अन्…
हॉलीवुड फिल्ममेकर आणि प्रोड्यूसर काइलन टायंग यांनी नुकतंच विपुल शहा यांच्याशी संपर्क केला असून त्यांच्यात या चित्रपटाच्या हक्काबाबत चर्चा सुरू आहे. काइलन टाइंग यांनी स्वतःला या चित्रपटाच्या रिमेकमध्ये रस असल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत विपुल शहा यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “माझ्या पहिल्या ‘आंखे’ चित्रपटाच्यासुद्धा हॉलिवूड रिमेकची मला ऑफर आली होती, पण त्यावर पुढे काहीच काम झालं नाही. पण या चित्रपटाच्या रिमेकबाबत होणाऱ्या चर्चेसाठी मी खूप उत्सुक आहे. ‘सनक’सारखा चित्रपट कोविड काळात लोकसंमोर आणण्यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतो. या चित्रपटाचा रिमेक होऊ शकतो असं मला वाटतंय, आणि तसं झालं तर आपल्या सगळ्यांसाठीच ही अभिमानास्पद गोष्ट असेल.”
विपुल यांनी बॉलिवूडमध्ये बरेच उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. आता ते ओटीटीविश्वातही सक्रिय आहेत. त्यांची ‘ह्युमन’ या वेबसीरिजला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आता या ‘सनक’च्या रिमेकबाबत ते आणि त्यांच्या चित्रपटाची टीम सगळेच खूप उत्सुक आहेत.